माझी मराठी
- सुमति इनामदार
प्राथमिक शिक्षण ‘मराठी’ - मातृभाषेतूनच असाव असं माझ स्पष्ट मत आहे. प्राथमिक शाळेची मुलं दहा वर्षापर्यंतची असतात. पहिली पाच वर्ष तर शिशू म्हणून घरातच जातात. नतंरच्या पाच वर्षात मराठीतून शिक्षण असलं तर मुलांच मराठी खूपच आकाराला येईल. पूर्वी आम्ही मराठीतूनच झालं, नंतर पाचवी म्हणजे इंग्रजी पहिली म्हणत.
अशी इंग्रजी सातवी म्हणजे मॅट्रिक म्हणत. लहान वयात मराठी व जाणत्या वयात इंग्रजी शिकल्यामुळे आमच्या पिढीच्या दोन्ही भाषा चांगल्या झाल्या. मोठेमोठे लेखक त्यामुळे निर्माण झाले. उभ्या जगात त्याच काही नडलं नाही. इंग्रजी भाषा मराठीच्या मानाने सोपी आहे. पहिली पासून इंग्रजी ठेवायचीच झाल्याच ऐच्छिक विषय म्हणून ठेवावी. त्यात कमी गुण मिळाले तरी प्रगतिपुस्तकावर फार परिणाम होऊ देऊ नये.
लांब, दूरवरच्या खेड्यापाड्यातून शिकणाऱ्या मुलांना आपली भाषा येणं हे जास्त महत्त्वाच आहे. त्यातल्या नापासाच प्रमाण वाढलं तर शाळेतली मुलांची हजेरी नक्कीच रोडवेल. वर्ग ओस पडतील. मात्र मराठीत शिक्षण दिल्यास निदान चौथीपर्यंत तरी दूर खेड्यापाड्यातील मुल-मुली आनंदाने शिकतील तेवढं झाल त्यांना आपल्या आयुष्यात उभं राहायला निश्चित मदत करील.
आणि मुळात आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही हा न्यूनगंड मनातून काढूनच टाका. तुम्ही टी.व्ही वर रशियन, चिनी, इटालियन वगैरे खेळाडू आपल्या मातृभाषेतूनच बोलतात हे तर ऐकलचं असेल. तुम्ही तुमच्या मातृभाषेतूनच बोलायला हवं! म्हणजे आत्मविश्वासानं बोलता येईल.
आपला भारत आता स्वतंत्र -स्वाभिमानी देश आहे. आपल्या स्वातंत्र्याला त्रेपन्न वर्ष झालेली आहेत. तेव्हा एवढा तरी स्व-भाषाभिमान आपण मनोम्न बाळगायला हवाच आहे! ते फारफार जरुरीच आहे, असं माझं स्पष्ट मत आहे!
तुम्ही तो मनोमनी बाळगाळ तर-
मराठी असे आमुची मायबोली ।
नसो आज ती राजभाषा नसे ॥
नसो आज ऐश्वर्य या माउलीला ।
यशाची पुढे दिव्य आशा असे ॥
हे द्रष्टे कवी ‘माधव-ज्युलियन’ यांचे बोल खरे होतील व तुम्ही उगवती पिढित ते साकार करणार आहात! याची मला पक्की मनोमन खात्री आहे.
मायबोली मराठीे
- सुरेश पोरे
सोनामाता मंदिरा जवळ,
आनंद नगर हिंगते खुर्द, पुणे ४११०५१
`पिकते तिथे विकत नाही' असे म्हणतात. तसेच महाराष्ट्रात राहून `मराठी' भाषेचे महत्त्व तितके जाणवत नाही! आई समोर असताना आईचे महत्त्व जाणवते का? आपण जेव्ह परप्रांतात काही काळासाठी जातो व सतत जेव्हा ती परप्रांतीय अनोळ्कि भाषा कानावर पडू लागते. तेव्हा आपण आपली मातृभाषा ऐकण्यासाठी कासावीस होतेओ. चुकून अपली भाषा बोलणारी , अनोळखी मंडळी दिसली तर ती माणसे अनोळखी असूनही खूप आपली वाटतात! हे भाषेचे अदृश्य धागे!
आता थोडी गंमत पहा! ही भाषा दर पंचवीस किलोमीटरवर वेगळी भासते. आपण कोल्हापुरला गेलो तर तिथे मराठी भाषा खणखणीत, स्पष्ट आणि नेमकी वर्मावर बोट ठेवणारी! तिथल्या स्त्रियाही म्हणतात, "आम्ही आलो! आम्ही जातो, मी जातो!" साताऱ्याला थोडा भाषेतला स्पष्टपणा नरम होतो. लंवगी मिरचीचा झटका जाऊन साताऱ्याच्या जर्द्याची गुंगी त्यात डोकावते, तरी पण "लई" "चिक्कार" `आयला' `लिका' वगैरे खास सातारी ढंगच! कोकणात भाषा अगदी मऊसूत होते. "ळ" चा उच्चार `ल'? "शाला" "फला" उच्चारही अगदी खालच्या स्वरांत, तोंडातल्या तोंडात शब्द, जणू, मासाच डुबकी घेतोय पाण्याच्या आतबाहेर! कोकणात एकदा मी एका कामगारास आपलेपणाने म्हणालो,"काय लेका!" तर त्या कामगाराचे एकदम पित्तच खवळले. तो म्हणाला, "लेका, म्हणू नका ती शिवी आहे!" माझी तर जीभ टाळूलाच चिकटली. तेव्हापासून मी कानाला खडा लावला. भाषेचे काही खरे नसते. कुठए एखादा शब्द ओवी ठरतो तर कुठे शिवी! भरवसा नाही !! तिकडे धुळे, मालेगावात तर मराठी भाषेवर "अहिराणी भाषेचा" प्रभाव! उच्चार व शब्दांच्या अनेक गंमती जंमती सहज दिसून येतात, जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे!'
असो, नदी वहाताना जशी वेगवेगळी वळणे घेते, तशी मराठी भाषा वेगवेगळ्य भागात नवी लय धारण करते. पण मूळचा गाभा मात्र तोच. संत ज्ञानेश्वरांनी छातीठोकपणे सांगितल्याप्रमाणे, `अमृताशी पैजा जिंकणारा' गोडा पवित्र आणि रसरशीत ! अशा `मायबोली मराठीस' करावेत सर्वांनीच अनंत प्रणाम!
No comments:
Post a Comment