Thursday, February 25, 2010

SHRAVANATLYA KAHANI

महालक्ष्मीची कहाणी

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला दोन बायका होत्या. एक आवडती होती. दुसरी नावडती होती. आवडतीचं नांव पाटमाधवराणी आणि नावडतीचं नांव चिमादेवराणी होतं. त्या राजाला एक शत्रु होता, त्याचं नांव नंदनवनेश्वर होतं. तो क्षणीं उडे, क्षणी बुडे, क्षणीं आताळीं जाई, क्षणीं पाताळीं जाई. असा राजाच्या पाठीस लागला होता. त्यामुळे राजा फार वाळत चालला. एके दिवशी राजानं सर्व लोक लोकांनीं राजाला बरं म्हटलं. त्याला जिकडे तिकडे शोधूं लागले. त्याच नगरांत एक म्हातारीचा लेक होता. तो आपल्या आईला म्हणूं लागला, “आई आई, मला भाकरी दें, मी राजाच्या शत्रूला मारायला जातों.” म्हातारी म्हणाली, “बाबा, तूं गरीबाचा पोर, चार पावलं पुढं जा, झाडाआड ही वाळली भाकरी खा. म्हणजे लोक तुला हंसणार नाहींत.” पोरानं बरं म्हणून म्हटलं. म्हातारीनं भाकरी दिली. म्हातारीचा लेक भाकरी घेऊन निघाला. सगळ्यांच्य पुढं गेला. इतक्यांत संध्याकाळ झाली. सर्व लोक घरीं आले. त्यांना नंदनवनेश्वर कांहीं सांपडला नाहीं. तशी राजाला फार काळजी लागली. पुढं फार रात्र झाली. म्हातारीचा पोर तिथंच राहिला.

पुढं मध्यरात्रीं काय झालं? नागकन्या-देवकन्या तिथं आल्या. महालक्ष्मीचा वसा वसूम लागल्या. पोरानं विचारलं, “बाई बाई, ह्यानं काय होतं?” त्यांनीं सांगितलं, “पडलं झडलं सांपडतं. मनीं चिंतलं कार्य होतं.” इतकं ऐकल्यावर तोहि त्यांच्याबरोबर वसा वसूं लागला. पूजा केली, घागरी फुंकल्या. पहांटेस उत्तरपूजा केली. जशी पहांटेस महालक्ष्मीमाय कोल्हापुरा जाती जागती झाली तसा नागकन्या-देवकन्यांनी आशीर्वाद मागितला. तसा, ह्यानंही मागितला. तसा देवीनं दिला. “राजाचा शत्रु मरेल, तुला अर्ध राज्य मिळेल, अर्ध भांडार मिळेल. माडीशी माडी बांधील. नवलवाट नांव ठेवील. तो वैरी डावा पाय मस्तकीं घेऊन उद्यां राजाच्या अंगणांत मरून पडेल.” असं म्हणून देवी अदृश्य झाली. म्हातारीचा पोर घरीं आला.

दुसऱ्या दिवशीं राणी पहांटेस उठली. परसांत आली. राजाचा वैरी मेलेला पाहिला. तिला फार आनंद झाला. तशी तिनं ही गोष्टा राजाला जाऊन सांगितली. राजानं चौकशी केली. म्हातारीचा पोर सगळ्यांच्या मागं होता. त्यानं ह्याला मारलं असेल, असं लोकांनी राजाला सांगितलं. राजानं त्याला बोलावूं धाडलं. म्हातारीचा पोर राजाच्या घरीं आला, त्यानं राजाला विचारलं, “राजा राजा, आळ नाहीं केला, अन्याय नाहीं केला, मला इथं का बोलावलं?” राजा म्हणाला, “भिऊं नको, माझा वैरी नंदनवनेश्वर कोणीं मारला? सगळे लोक तुझं नांव सांगतात. याचं काय कारण तें सांग.” पोर म्हणाला, “राजा राजा, “ मी मारला नाहीं,पण तो देवीच्या वरानं मेला.”राजा म्हणाला, “ती देवी कोणती? तिला तूं कुठं भेटलास?” पोर म्हणाला. “सगळ्यांच्या पाठीमागून निघालों. त्यांच्यापुढें थोडासा गेलों. शिळी भाकर झाडाआड करून खाल्ली. येतां येतां रात्र झाली. झाडाखाली वस्ती केली. रात्रीं नागकन्या-देवकन्या तिथं आल्या. त्यांनीं महालक्ष्मीचा वसा वसला. त्याची मी चौकशी केली. पुढं मीं पूजा केली. घागरी फुंकल्या. पहांटेस महालक्ष्मीमाय कोल्हापुरा जाती जागती झाली. सर्वांना आशीर्वाद दिला, तसा मलाही दिला.” “तुला आशीर्वाद काय मिळाला?” “मला आशीर्वाद असा मिळाला, राजाचा शत्रू मरेल, तुला अर्धे राज्य मिळेल, अर्ध भांडार मिळेल. माडीशी माडी बांधील, नवलवाट नांव ठेवील.” असं म्हणून देवी अदृश्य झाली. मग आम्हीं उत्तरपूजा केली. तातू घेऊन घरीं आलों, तों तुझं बोलावणं आलं.”राजानं हकीकत ऐकली. आनंदीआनंद झाला. पोराला अर्ध राज्य दिलं, अर्ध भांडार दिलं. माडीशीं माडी बांधून दिली. नवलप्ट नांव ठेवलं. पुढं म्हातारीचा पोर आनंदानं वागूं लागला.

ही बातमी आवडत्या राणीला समजली, राणीनं नवलवाटाला बोलावूं धाडलं. महालक्ष्मीचा वसा कसा म्हणून विचारलं. नवलवातानं तातू दाखविला. तिला सांगितलं, “आश्विनमास येईल, पहिली अष्टमी येईल, त्या दिवशीं सोळा सुतांचा तातू तेल-हळद लावून करावा. सोळा दुर्वा, सोळा तांदूळ घेऊन तुळशीची पंचामृती पूजा करावी. ज्याला हा वसा घेणं असेल त्यानं तातूची पूजा करावी. तातू हातांत बांधावा. दुसरी कहाणी चतुर्थी व तिसरी चतुर्दशीला करावी. याप्रमाणं दर आश्विनमासीं करावं.” असा तिनं वसा समजून घेतला. आपले तें व्रत पाळूं लागली.

पुढें एके दिवशी काय झालं? राजा राणीच्या महालीं आला. सारीपाट खेळूं लागला. राजानं राणीचा तातू पाहिला. हें काय? म्हणून विचारलं. राणीनं तातूची हकीकत सांगितली. राजा म्हणाला, “माझे घरीं हारे बहू, दोरे बहू, कांकणं बहू; कळाचे बहू; व्रताचं सूत तोडून टाक. मला ह्याची गरज नाहीं.” पुढं रात्र झाली राजाराणी निजलीं. सकाळीं दासी बटकी महाल झाडूं लागल्या. केरांत त्यांना तातू सांपडला. दासींनीं तो तातू नवळवाटाला दिला, त्याला राणीचा फार राग आला. इतक्यांत काय चमत्कार झाला? त्याला नावडती राणी भेटली. तिनं तो तातू मागितला. हा म्हणाला, “उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील.” तिनं सांगितलं, “उतणार नाहीं,मातणार नाहीं, घेतला वसा टाकणार नाहीं.” तसा तातू तिच्या हवालीं केला, वसा सांगितला.

पुढं अश्विनमास आला. पहिली अष्टमी आली. त्या दिवशी काय चमत्कार झाला? देवी महालक्ष्मीनं महातारीचं सोंग घेतलं. पाटमाधवराणीचे महालीं गेली. महालक्ष्मीची तिला आठवण आहे किंवा नाहीं हें पाहू लागली, तों घरांत कोठें कांहीच तयारी दिसेना. तेव्हां ती पाटमाधवराणीला म्हणूं लागली, “अग अग पाटमाधवराणी, पुत्राची माय, आज तुझ्या घरी काय आहे?” राणीनं उत्तर दिलं, “आज माझ्या घरी कांहीं नाही.” तेव्हां ती राणीला पुन्हां म्हणाली, “अग अग पाटमाधवराणी, पुत्राची माय, म्हातारीला पाणीला देशीला तर तुझ्या राज्याला पुरे होईल.” राणीनं उत्तर दिलं, “म्हातारीला तांब्याभार पाणी दिलं तर माझ्या राज्याला पुरणार नाहीं.” तेव्हां म्हातारीनं पुन्हा पाटमाधवराणीला हाक मारली, “अग अग पाटमाधवराणी, पुत्राची माय, म्हातारीला दहींभाताची शिदोरी देशील, तर तुझ्या राज्याला पुरे होईल.” राणी म्हणाली, “म्हातारीला दहीभाताची शिदोरी दिली, तर माझ्या राज्याला पुरणार नाही.” म्हातारीला राग आला. तिनं शाप दिला. तो काय दिला? “सवतीच्या न्हाणीं डाराडुरी करीत असशील. अर्धं आंग बेडकाचं, अर्धं आंग मनुष्याचं, अशी होऊन पडशील.” इतकं राणीनं ऐकलं. खदखदा हंसली.

पुढं म्हातारी निघून गेली ती चिमादेवराणीच्या महालीं आली. इकडे तिकडे पाहूं लागली. तों तिला जिकडे तिकडे गडबड दिसली. एकीकडे पूजेचं साहित्य दिसलं, दुसरीकडे महालक्ष्मीचा मुखवटा मांडलेला पाहिला. तिनं चिमादेवराणीला विचारलं, “अग अग चिमादेवराणी, पुत्राची माय. आज तुझ्या घरीं काय आहे?” तिनं उत्तर दिलं. “आज माझ्या घरीं महालक्ष्मी आहे.” तेव्हां म्हातारी म्हणाली “कशानं ओळखावी? कशानं जाणावी?” तों ती सकाळीं कुंवारीण झाली, दुपारी सवाशीण झालीं; संध्याकाळीं पोक्त बायको झाली, अशा तिन्ही कळा तिला पालटून दाखविल्या. नंतर राणीनं तिला घरांत बोलावलं, न्हांऊं माखूं घातलं, पीतांबर नेसायला दिला. चौरंग बसावयास दिला. राणीनं व नवलवाटानं तिची पूजा केली. संध्याकाळ झाली. देवीसमोर दोघंजणं घागरी फुंकूं लागली. तसा घागरींचा आवाज राजाचे कानीं गेला. धुपाचा वास महालीं आला. तशी राजानं चौकशी केली. शिपायांना हांक मारली. “नावडातीच्या घरीं आवाज कशाचा येतो तो तुम्ही पाहून या” शिपाई नावडतीच्या घरीं आले. महालक्ष्मीचं दर्शन घेतलं, तसेच ते परतले, राजाच्या महालीं आले. पाहिलेली हकीकत सांगितली. तसा राजा म्हणाला, “मला तिथं घेऊन चला.” शिपाई राजाला घेऊन राणीकडे आले. राणीनं पंचारती ओवाळली, राजाचा हात धरला, मंदिरात घेऊन गेली, सारीपाटा खेळूं लागलीं. खेळतां खेळतां पहांट झाली. पहांटेस महालक्ष्मीमाय कोल्हापुरा जाती जागती झाली तशी राणी म्हणाली, “माय, मला आशीर्वाद दे.” महालक्ष्मी म्हणाली, “तुला आशीर्वाद काय देऊं? राजा तुला सकाळीं घेऊन जाईल आणि तुझी सवत तुझ्या न्हाणीं डाराडुरी करील. अर्धे आंग बेडकाचं, अर्धे आंग मनुष्याचं, अशी होऊन पडेल.” तशी चिमादेवीराणीनं तिची प्रार्थना केली कीं, “तिला इतका कडक शाप देऊं नये.” तसं देवीनं सांगितलं की, राजा तिला बारा वर्ष वनांत तरी धाडील.” असं म्हणून देवी अदृश्य झाली.

उजाडल्यावर राजानं तिला रथांत घातलं, वाड्यासमोर घेऊन आला. पाटमाधवराणीला निरोप धाडला कीं, राजा राणीला घेऊन येतो आहे. तिला तूं सामोरी ये. तशी ती फाटकं तुटकं नेसली, घाणेरडी चोळी अंगांत घातली, केंस मोकळे सोडले, कपाळीं मळवट भरला, जळतं खापर डोकीवर घेतलं, आणि ओरडत किंचाळत पुढं आली. तों राजानं विचारलं, “ओरडत किंचाळत कोण येत आहे? भूत आहे कीं खेत आहे?” शिपायांनीं सांगितलं, ‘भूत नाहीं, खेत नाहीं, तुझीच राणी तुला सामोरी येत आहे.” राजा म्हणाला, “तिला रानांत नेऊन मारून टाका.” असा शिपायांना हुकूम केला. आणि आपन उठून महालीं आला, राजाराणी सुखानं नांदूं लागलीं.

इकडे शिपायांनीं पाटमाधवराणीला रानांत नेलं. तिला राजाचा हुकूम सांगितला. राणी मुळूमुळूं रडूं लागली, तसं शिपायांनीं सांगितलं. “बाई बाई, रडूं नको; आम्ही तुझ्या हातचं खाल्लेले प्यालेले आहों. आमच्यानं कांहीं तुला मारवत नाहीं, म्हणून आम्ही तुला सोडून देतों. पुन्हां तूं या राज्यांत कांहीं येऊं नको. “असं म्हणाले. राणीला तिथं सोडून दिलं. आपण निघून नगरांत आले.

नंतर ती तशीच फिरतां फिरतां एका नगरांत गेली. पहिल्यानं कुंभाराचे आळींत गेलीं. तिथं नव्या राणीला नवा कळस घडवीट होते. परंतु एकही कळस उतरेना. तेव्हा त्यांनीं चौकशी केली. नवं माणूस कोण आलं आहे? तों ही सांपडली. त्यांनीं तिला हांकून पिटून लावलं. पुढं ती कांसाराच्या आळींत गेली. तों तिथं नव्या राणीला नवा चुडा करीत होते. पण एकही चुडा उतरेना. तेव्हां चौकशी केली. नवं माणूस कोण आलं आहे? तेव्हां ही सांपडली. लोकांनीं तिला हांकून पिटून लावलं. तिथून निघाली ती सोनाराच्या आळींत एली. तिथं नव्या राणीला नवा दागिना घडावीत होते. तों एकही दागिना उतरेना. तेव्हां त्यांनी चौकशी केली. नवं माणूस कोण आलं आहे? तेव्हां ही सांपडली. त्यांनीं तिला हाकून पिटून लावलं. तिथून निघाली. साळ्यांच्या आळींत गेली. तों तिथ नव्या राणीसाठीं नवा साडा विणीत होते. पण एकही साडा उतरेना. मग त्यांनी चौकशी केली. नवं माणूस कोण आलं आहे? इकडे तिकडे पाहूं लागले. तों ही सांपडली. मग तिला तेथून हांकून पिटून लावलं. पुढं ती रानांत निघऊन गेली.

जातां जातां ऋषीची गुंफा दृष्टीस पडली. तिथं गेली. तों ऋषि ध्यानस्थ बसले होते. ती तिथंच राहिली. ऋषि स्नानाला गेले म्हणजे ही आपली झाडसारवण करी, पूजेचं मांडून ठेवी. अशी तिनं बारा वर्ष सेवा केली. ऋषि प्रसन्न झाले व म्हणाले, “इथं झाडसारवण कोण करतं, त्यानं माझ्यासमोर यावं.” तशी ती ऋषींच्या पुढं आली, नमस्कार केला. ऋषींनीं झाडसारवणचं कारण विचारलं. ती म्हणाली, “अभय असेल तर सांगते,” ऋषींनीं अभय दिलं. राणीनं पहिल्यापासून हकिकत सांगितली, ऋषींनीं पोथ्या पुस्तकं वाचून पाहिली. तों तिच्यावर महालक्ष्मीचा कोप आहे असं समजल. ऋषींनीं तिच्याकडून महालक्ष्मीची पूजा करविली, रात्रीं घागरीं फुंकविल्या, पहाटे महालक्ष्मी माय कोल्हापुरा जाती जागती झाली, तसा राणीनं आशीर्वाद मागितली. देवी रागावली होती. ऋषींनीं देवीजवळ क्ष्मा मागितली होती. देवीनं उःशाप दिला. “ह्या झाडाखालीं सगळी तयारी कर. पाय धुवायला पाणी ठेव. चंदनाची उटी ठेव. फराळाची तयारी कर. कापुरी विडा ठेव. वाळ्याचा पंखा ठेव. त्या सगळ्याला तुझ्या हाताचा वास येऊं लागेल. राजा इथं आज उद्यां येईल. तहानेला असेल. त्याचे शिपाई थंड पाण्याचा शोध करतील. ते ही सगळी तयाई पाहातील. राजाला जाऊन सांगतील. नंतर राजा इथं येईल.” त्याप्रमाणं दुसऱ्या दिवशीं तिथं राजा आला. थंडगार छाया पाहिली. स्वस्थ बसून विश्रांती घेतली. नंतर पाय धुतले. पोटभर फराळ केला, पाणी प्याला. कापुरी विडा खाल्ला, आत्मा थंड झाला, पुढं राजानं शिपायांना विचारलं, “इथं मी पाणी प्यालों, फराळ केला, विडा खाल्ला, ह्या सगळ्याला पाटमाधवराणीच्या हाताचा वास कसा आला?" शिपाई म्हणाले, “अभय असेल तर सांगतो.” राजानं अभय दिलं. तेव्हां शिपाई म्हणाले, “आम्ही तिच्या हातचं खाल्लं प्यालं, आमच्यानं कांहीं तिला मारवलं नाहीं म्हणून आम्हीं तिला सोडून दिलं.” राजा म्हणाला. “असं असेल तर तिचा तुम्ही आसपास शोध करा.” शिपाई निघाले. ऋषीच्या गुंफा पाहिल्या. तिथं ही सांपडली. राजाला जाऊन शिपायांनी सांगितलं. राजा उठला. ऋषींच्या गुंफेत्र गेला. त्यांचं दर्शन घेतलं. ऋषींनीं ओळखलं. त्याला सगळी हकीकत सांगितलई. पुष्कळसा बोध केला. राणीला नमस्कार करायला सांगितलं. नंतर तिला राज्या हवालीं केलं. तसा उभयतांनी ऋषींना नमस्कार केला. ऋषींनीं त्यांना आशीर्वाद दिला. पुढं राजानं तिला रथांत घातलं, आपल्या नगरईंत घेऊन आला. बाहेर रथ उभ केला. राणीला निरोप पाठविला. “राजा पाटमाधवराणीला घेऊन येतो आहे. त्याला तूं सामोरी ये.” तशी राणी न्हाली, माखली, पीतांबर नेसली, शालजोडी पांघरली, अलंकअ घातले. नगरांच्या नारी बरोबर घेतल्या आणि वाजत गाजत राणी सामोरी गेली. राजानं विचारलं, “वाजतगाजत कोण येत आहे? नागकन्या कीं देवकन्या?” तसं शिपायांनीं सांगितलं, “नागकन्या नाहीं देवकन्या नाहीं, तझीच राणी तुला सामोरी येत आहे. ” तेव्हां राजा पाटमाधवराणीला म्हणाला, “तूं जर, अशीच सामोरी आली असतीस, तर तुला इतके हाल भोगावे लागले नसते.” राणी उगीच बसली राजानं चिमादेवराणीला उचलून रथांत घेतलं आणि दोघींसह वाजतगाजत नगरांत आला. सुखानं रामराज्य करूं लागला.

जशी पाटमाधवराणीवर महालक्ष्मीमाय कोपली, तशी तुम्हां आम्हांवर न कोपो. ही साठां उत्तराची कहाणी, पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.

( तात्पर्य : देवीची भक्ति सर्व काळीं सारख्याच भावानें करावीं. अडचणीच्या वेळीं त्याला प्रसन्न करण्यासाठीं व्रतें उपोषणें करावीं आणि मग बरे दिवस आल्यावर देवाला विसरावें, हें चांगलेंं नाहीं. )


श्रीगणपतीची कहाणी

Ganapati

Marathi Mythological Stories of Lord Ganesh(Ganapati)

ऐका परमेश्वरा गणेशा, तुमची कहाणी, निर्मळ मळे, उदकाचे तळें, बेलाचा वृक्ष, सुवर्णाचीं कमळें, विनायकाचीं देवळें रावळें. मनाचा गणेश मनीं वसावा. हा वसा कधीं घ्यावा? श्रावण्या चौथीं घ्यावा. माही चौथीं संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशापायलीचं पीठ कांडांव. अठरा लाडू करावे. सहा देवाला द्यावे, सहा ब्राह्मणाला द्यावे, सहांचं सहकुटुंबी भोजन करावं. अल्प दान, महापुण्य. असा गणराज मनीं ध्याइजे, मनीं पाविजे; चिंतिलं लाभिजे; मनकामना निर्विघ्र कार्यसिध्दि करिजे.

ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरी सुफळ सपूर्ण.

गोपद्मांची कहाणी

ऐका गोपद्मांनो, तुमची कहाणी. स्वर्गलोकीं इंद्रसभा, चंद्रसभा, कौरवसभा, पाडवसभा इत्यादि पांची सभा बसल्या आहेत. ताशे मर्फे वाजाताहेत, रंभा नाचताहेत, तों तुंबुऱ्याच्या तारा तुटल्या. मृदुंगांच्या मेऱ्या फुटल्या. असें झाल्यावर सभेचा हुकूम झाला. "करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा. गांवांत कोणी वाणवशावाचून असेल, त्याच्या पाठीचा तीन बोटं कंकर काढा, तंबुऱ्याला तारा लावा, कीर्तन चालू करा, रंभा नाचत्या करा." असा हुकूम झाल्यावर कृष्णदेव आपल्या मनांत भ्याले. माझी बहीण सुभद्रा हिनं कांहीं वाणवसा केला नसेल. तेव्हा ते उठले, तिच्याकडे जाऊन चौकशी केली. तिनं कांहीं वाणवसा केला नाहीं. नंतर कृष्णांनीं तिला वसा सांगितला. " सुभद्रे सुभद्रे, आखाड्या दशमीपासून तीस तीन गोपद्मं देवाच्या द्वारी काढावीत, तितकींच ब्राह्मणाचे द्वारीं, पिंपळाचे पारीं, तळ्याचे पाळीं व गाईच्या गोठ्यांत काढून पूजा करावी. हा वसा कार्तिक्या दशमीस संपूर्ण करावा. याप्रमाणं पाच वर्ष करावं. उद्यापनाचे वेळीं कुवारणीस जेवायला बोलवावी. पहिल्या वर्षी विडा द्यावा, दुसऱ्या वर्षी चुडा भरावा, तिसऱ्या वर्षी केळ्यांचा फणा द्यावा, चौथ्या वर्षी उंसाची मोळी द्यावी, पांचव्या वर्षी चोळी परकर नेसवून आपल्या वशाचं उद्यापन करावं." असं सांगून कृष्ण पूर्व ठिकाणी येऊन बसले. नंतर लागलीच सुभद्रेनं सांगितल्याप्रमाणं केलं. पुढं सभेंत कळलं. सुभद्रा वाणवशाशिवाय आहे असं समजल्यावर तिकडे दूत जाऊन पहातात, तों तिनं वसा वसला आहे. पुढं येतां येतां गांवाबाहेर एक हत्तीण वाणवशाशिवाय त्यांना दिसली. ती दक्षिणेस पाय, उत्तरेस डोकं करून निजलेली होती. तेव्हां तिच्या पाठीचा कंकर काढून नेला. नंतर तंबोऱ्याच्या तारा जोडल्या, मृदुंगाच्या भेऱ्या वाजत्या केल्या. तशाच रंभा नाचत्या केल्या.

जसं ह्या व्रताच्या योगानं सुभद्रेवरचं संकट टळलं, तसं तुमचं आमचं टळो. ही साठां उत्तरांची कहाणी पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण ( तात्पर्य : प्रत्यकाने नेमधर्मानें वागावें म्हणजे सुख मिळतें.)


पांचा देवांची कहाणी

ऐका पांची देवांनो, तुमची कहाणी. एके दिवशी ईश्वरपार्वती पृथ्वीप्रदक्षिणा करण्यास निघालीं. मुक्कामीं उतरलीं. पार्वती पादसेवा करूं लागली. तिचे हात कठीण लागले. तिला एका गरीब ब्राह्मणाच्या बायकोचं बाळंतपण करूं सांगितलं. " तुझे हात कमळासारखे मऊ होतील" पार्वतीनं ब्राह्मणाच्या बायकोचं बाळंतपण केलं. ती फार उतराई झाली. पार्वतीला म्हणाली," तूं माझी मायबहीण आहेस. मला कांही वाण सांग, वसा सांग." तिनं वसा सांगितला. काय सांगितला? चातुर्मास आला, आखाडी दशमी आली, गणपतीची पूजा करावी, दुर्वा वहाव्या, मोदकांचा नैवेद्य दाखवावा, वर तुपाची धार धरावी, कार्तिक्या दशमीस ब्राह्मण जेवायला सांगून आपल्या वशाचं उद्यापन करावं. याप्रमाणं विष्णूचं पूजन करावं. तुळशीपत्र वहावं, खिरीचा नैवेद्य दाखवावा, वर तुपाची धार धरावी आणि कार्तिकांत ब्राह्मण सांगून उद्यापन करावं. तसंच नंदीला स्नान घालावं, आघाड्याचं पान वहावं; खिचडीचा नैवेद्य दाखवावा, वर तुपाची धार धरावी, ब्राह्मण सांगून उद्यापन करावं. तसंच महादेवाला स्नान घालावं, बेलाची पानं वहावीं, दहींभाताचा नैवेध दाखवावा, वर तुपाची धार धरावी आणि ब्राह्मण जेवूं घालून उद्यापन करावं. तसंच पार्वतीला स्नान घालावं, पांढरीं फुलं वहावीं, घारगेपुऱ्यांचा नैवेद्य दाखवावा आणि कार्तिकांत ब्राह्मण जेवूं सांगून उद्यापन करावं. हा वसा कधी घ्यावा? आखाड्या दशमीस घ्यावा. कार्तिक्या दशमीस संपूर्ण करावा." असा तिनं वसा सांगितला व आपण अदृश्य झाली.

बरेच दिवस झाले. इकडे पार्वतीनं काय केलं? गरिबीचा वेष घेतला. त्या बाईला भेटायला गेली. तिनं हिला ओळखलं नाहीं. पार्वतीला राग आला, ती गणपतीकडे गेली. सगळी हकीकत सांगितली. " ती उतली आहे, मातली आहे, तिचं वैभव काढून टाक," " ही गोष्ट मजपासून घडायची नाहीं. ती कांहीं उतायची नाहीं, मातायची नाहीं. तिनं माझी चार महिने पूजा केली, दूर्वा वाहिल्या, मोदकांचा नैवेद्य दाखविला, वर तुपाची धार धरली आहे. मी कांहीं तिचं वैभव काढणार नाहीं.’ असं गणपतीनं म्हटल्यवर विष्णुकडे गेली, सगळी हकीकत सांगितली. " ती उतली आहे, मातली आहे. तिचं वैभव काढून टाक." " ही गोष्ट मजकडून घडायची नाहीं. ती कांहीं उतायची नाहीं, मातायची नाहीं. तिनं माझी चार महिने पूजा केली. तुळशीपत्र वाहिलं, खिरीचा नैवेद्य दाखविला, वर तुपाची धार धरली आहे. मी कांहीं तिचं वैभव काढणार नाहीं." तिथून उठली, नंदीकडे गेली. सगळी हकीगत सांगितली. " ती उतली आहे, मातली आहे, तिचं वैभव काढून टाक." ही गोष्ट मजकडून घडायची नाहीं. ती कांहीं उतायची नाहीं. मातायची नाहीं, तिनं माझी चार महिने पूजा केली. आघाड्याचं पान वाहिलं. खिचडीचा नैविद्य दाखविला, वर तुपाची धार धरली आहे. मी कांहीं तिचं वैभव काढणार नाहीं." तिथून उठली, महादेवाकडे गेली. सगळी हकिकत सांगितली. " ती उतली आहे. मातली आहे. तिचं वैभवं काढून टाकं." ही गोष्ट मजपासून घडायची नाहीं. ती काही उतायची नाहीं. मातायची नाहीं. तिनं माझी चार महिने पूजा केली. बेलाची पानं वाहलीं, दहीभाताचा नैवेद्य दाखविला, वर तुपाची धार धरली आहे. मी कांहीं तिचं वैभव काढणार नाहीं. तूं गरिबीच्या वेषानं गेलीस म्हणून तुला ओळखलं नाहीं. पहिल्या वेषानं जा म्हणजे तुला ओळखील." श्रीमंती वेषानं पार्वती पुन्हा गेली. बसायला पाट दिला. पाय धरून आभारी झाली. तिला पार्वती प्रसन्न झाली, उत्तम आशीर्वाद दिला.

जसे तिला पांच देव प्रसन्न झाले, तसे तुम्हां आम्हां होवोत. ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरीं, सुफळ संपूर्ण.

धरित्रीची कहाणी

ऐका परमेश्वरा, धरित्रीमाये, तुमची कहाणी. आट पाट नगर होतं. नगरांत एक ब्राह्मण होता, त्या ब्राह्मणाची स्त्री काय करी? धरित्री मायेचं चिंतन करी. वंदन करी. ‘धरित्रीमाये, तूंच थोर, तूच समर्थ, कांकणलेल्या लेकी दे. मुसळकांड्या दासी दे. नारायणासारखे पांच पुत्र दे. दोघी कन्या दे. कुसुंबीच्या फुलासारखे स्थळ दे.

हा वसा कधीं घ्यावा? आखाड्या दशमीस घ्यावा, कार्तिक्या दशमीस संपूर्ण करावा किंवा श्रावणी तृतीयेला घ्यावा, माघी तृतीयेला संपूर्ण करावा. सहा रेघांचा चंद्र काढावा, सहा रेघांचा सूर्य काढावा, सहा गाईचीं पावलं काढावीं व त्यांची रोज पूजा करावी. संपूर्णाला काय करावं? वाढाघरची सून जेवू सांगावी. कोरा करा, पांढरा दोरा, चोळीपोळीचं वाण द्यावं आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं.

ही धरित्रीमायेची कहाणी, साठां उत्तरांची पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.

( तात्पर्य : धरित्रीमातेला पुज्य मानून तिचें नेहमीं पूजन करावें.)

दिव्यांच्या अंवसेची कहाणी

ऐका दीपकांनो, तुमची कहाणीं. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशीं घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला, आणि उंदरांवरती आळ घातला. आपल्यवरचा प्रवाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला कीं, आपल्यावर उगाच आळ आला आहे. तेव्हां आपण हिचा सूड घ्यावा. म्हणून सर्वांनीं विचार केला. रात्रीं तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली. दुसरे दिवशीं तिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली. घरांतून तिला घालवून दिलं. तिचा रोजचा नेम असे. रोज दिवे घांसावे. तेलवात करावी, स्वतः लावावे. खडीसारखेनं त्यांच्या ज्योती साराव्या. दिव्यांच्या अंवसेच्या दिवशीं त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याप्रमाणं ती घरांतून निघाल्यावर बंद पडलं. पुढं दिव्यांच्या अंवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली मुक्कामाला उतरला. तिथें त्याच्या दृष्टीला एक चमत्कार पडला. आपले सर्व गांवांतले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांशी गोष्टी करीत आहेत. कोणाच्या घरीं जेवायला काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली, वगैरे चौकशी चालली आहे. सर्वांनी आपआपल्या घरीं घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्यामागून राजाच्या घरचा दिवा सांगूं लागला. "बाबांनो, काय सांगू? यंदा माझ्या सारखा हतभागी कोणी नाहीं. दरवर्षी सर्व दिव्यांत मुख्य असायचा. माझा थाटमाट जास्ती व्हायचा. त्याला यंदा अशा विपत्तींत दिवस काढावे लागत आहेत.’ इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, "असं होण्याचं कारण काय?" मग तो सांगू लागला. " बाबांनो, काय सांगू? मी ह्या गांवच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची सून होती. तिनं एके दिवशी घरांतला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवरती आळ घातला. आपल्यावरचा प्रवाद टाळला. इकडे उंदरांनीं विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. म्हणून सर्वांनी विचार केला. रात्री तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणांत नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशीं तिची फजिती झाली. सासूदिरांनीं निंदा केली. घरांतून तिला घालवून दिलं. म्हणून मला हे दिवस आले. ती दर वर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो." असं म्हणून तिला आशीर्वाद दिला.

हा सर्व घडलेला प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाहीं, अशी त्याची खात्री झाली. घरीं आला. कोणी प्रत्यक्ष पाहिलं आहे काय, म्हणून चौकशी केली. तिला मेणा पाठवून आणलं. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरांत मुखात्यारी दिली. सुखानं रामराज्य करूं लागली.

तर असा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळाला, तसा तुमचा आमचा टळो. ही साठां उतरांची कहाणी, पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

( तात्पर्य : आपण कोणाचें चांगले केलें तर तें फुकट न जातां त्याचें फळ मिळतें.)

आदित्यराणूबाईची कहाणी

ऐका आदित्यराणूबाई तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरांत एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुलं, दूर्वा, आणायला रानांत जात असे. तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या. ब्राह्मणानं विचारलं,"काय ग बायांनों, कसला वसा वसतां? तो मला सांगा." " तुला रे वसा कशाला हवा? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील." ब्राह्मण म्हणाला, "उतत नाहीं, मातत नाहीं, घेतला वसा टाकीत नाहीं." तेव्हां त्या म्हणाल्या, "श्रावणमास येईल, तेव्हां पहिल्या आदितवारीं मौन्यानं (मुकाट्यानं) उठावं, सचीळ (वस्त्रासहित) स्नान करावं, अग्रोदक पाणी आणावं. विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्यराणूबाई काढावी. सहा रेघांचं मंडळ करावं, सहा सुतांचा तातू करावा. त्याला सहा गांठी द्याव्या. पानफूल वहावं, पूजा करावी. पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगांचा धूप, गुळाखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, सहा मास चाळावी, सहा मास पाळावी, माघी रथसप्तमीं संपूर्ण करावं. संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर, लोणकडं तूप, मेहूण जेवूं सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोडगळसरी द्यावी, ती नसेल तर दोन पैसे दक्षणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं." असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली.

तेव्हां राजाच्या राणीनें ब्राह्मणाला बोलावूं धाडलं, ब्राह्मण जाते वेळेस भिऊं लागला. कांपूं लागला. तेव्हां राजाच्या राणीनं सांगितलं, " भिऊं नका, कांपू नका, तुमच्या मुली आमचे येथें द्या" "आमच्या मुली गरीबाच्या, तुमच्या घरीं कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल." राणी म्हणाली, " दासी करीत नाहीं, बटकी करीत नाहीं. राजाची राणी करूं, प्रधानाची राणी करूं."

मार्गेश्वराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या, एक राजाचे घरीं दिली. दुसरी प्रधानाचे घरीं दिली. गेल्या पावलीं मुलींचा समाचार घेतला नाहीं. बारा वर्षांनीं समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेंकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. "बाब बाबा, गूळ खा पाणी प्या." गूळ खात नाहीं, पाणी पीत नाहीं. माझी कहाणी करायची आहे ती तूं ऐक." तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाहीं. राजा पारधीला जाणार आहे. त्याला जेवायला उशीर होईल.

तोच त्याचे मनांत राग आला. तेथून निघाला प्रधानाच्या घरीं गेला. तिनं पाहिलं, आपला बाप आला. म्हणून बसायला पाट दिला; पाय धुवायला पाणी दिलं. "बाबा, बाबा, गूळ खा, पाणी प्या." " गूळ खात नाहीं पाणी पित नाहीं, माझी कहाणी करायची आहे, ती तूं अगोदर ऐक. " तुझी कहाणी नको ऐकूं तर कोणाची ऐकूं?" घरांत गेली, उतरडींची सहा मोत्यें आणलीं. तीन आपण घेतलीं. तीन बापाच्या हातांत दिलीं. त्याने मनोभावें कहाणी सांगितली लेकीनं चित्तभावें ती ऐकली.

नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरीं आला. बायकोनं विचारलं, " मुलींचा समाचार कसा आहे?" जिनं कहाणी ऐकलीं नाहीं, ती दरिद्रानं पीडली. दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती, ती भाग्यनं नांदत आहे."

इकडे दरिद्री जी झाली होती, तिनं आपल्या लेकाला सांगितले. "मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन कांहीं दिलं तर घेऊन ये." पहिल्या आदितवारीं पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पाळीं जाऊन उभा राहिला." अग अग दासींनों, तुम्ही दासी कोणाच्या?" " आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे." "कसा आला आहे? तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे." ‘परसदारनं घेऊन या.’

परसदारानं घेऊन आल्या. न्हाऊं माखूं घातलं, पीतांबर नेसायला दिला, जेवू खाऊं घातलं. कोहोळा पोखरला, होनमोहोरा भरल्या. "वाटेस आपला जाऊं लागला. तों सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला. हातींचा कोहोळा काढून नेला. घरीं गेला. आईनं विचारलं, " काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?" दैवें दिलं, कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढं उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं. पण सर्व गेलं.

पुढं दुसऱ्या आदितवारीं दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळीं जाऊन उभा राहिला. "अग अग दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या?" "आम्ही दासी प्रधानाच्या." प्रधानाच्या राणीला निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरीं नेऊन न्हाऊं माखूं घातलं पीतांबर नेसायला दिला, जेवूं खाऊं घातलं. काठी पोखरून होनामोहोरांनीं भरून दिली. " बाबा, ठेवूं नको. विसरूं नको. जतन करून घरीं घेऊन जा, " म्हणून सांगितलं. वाटेंत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला, हातची काठी काढून घेतली. घरीं गेला, झालेली गोष्ट राणीला सांगितली. "दैवें दिलं, तें सर्व कर्मानं नेलं."

पुढं तिसरे आदितवारीं तिसरा मुलगा गेला, तळ्याच्या पाळीं उभा राहिला. त्यालाही पहिल्यासरखं प्रधानाचे घरीं नेऊन न्हाऊं माखूं घातलं, पीतांबर नेसायला दिला, जेवूं खाऊं घातलं, नारळ पोखरून होनमोहोरांनीं भरून दिला. " ठेवू नको, विसरूं नको." म्हणून सांगितलं, घरीं जाताना विहिरींत उतरला. तों नार्ळ गडबडून विहिरींत पडला. घरीं गेला. आईनं विचारलं. " काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?" आई ग, मावशीनं दिलं, पण दैवानं तें सर्व बुडालं."

चवच्या आदितवारी चवथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळीं उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरीं नेऊन न्हाऊं माखूं घातलं, पीतांबर नेसायला दिला. जेवूं खाऊं घातलं. त्याला दह्याची शिदोरी होनामोहोरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरीं गेला. आईनं विचारलं, "काय रे बाबा, मावशीनं काय दिलं?" "आई मावसशीनं दिलं, पण दैवानं तें सर्व नेलं."

पांचव्या आदितवारीं आपण उठली, तळ्याच्या पाळीं उभी राहिली. दासींनीं तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरीं नेलं. न्हाऊं घात्लं. माखूं घातलं, पाटाच बेसायला दिला. प्रधानाची राणी आदितवाराची कहाणीकरूं लागली. " काय वसा करतेस तो मला सांग." बहीण म्हणाली, "अग अग चांडाळणी, पापिणी, बापाची कहाणी ऐकली नाहींस, म्हणून तुला दरिद्र आलं." राजाच्या राणीनं विचारलं, "याला बहिणीच्या घरीं राहिली. श्रावणास आला. सांगितल्याप्रमाणं सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावूं धाडलं. "मावशी मावशी, तुला छत्रं आलीं, चामरं आलीं, पाईक आले, परवर आले." "मला रे पापिणीला छत्रं कोठली? चामरं कोठलीं? पाईक कोठले? परवर कोठे?" बाहेर जाऊन दाराशीं बघतात, तो राजा बोलावूं आला आहे. राजा आला तशी घरीं जायला निघाली.

एकमेकींना बहिणीबहिणींनीं अहेर केले. वाटेनं जाऊं लागलीं. पहिल्या मजलेस सैपांक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं, तों कहाणीची आठवण झाली. " करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा. नगरांत कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा." "तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ? माझं पोट भरलं पाहिजे." असं म्हणून तो राणीकडे आला. तशीं सहा मोत्यें राणीनं घेऊन तीन त्याला दिलीं. तीन आपल्या हातांत ठेवलीं. मनोभावें कहाणी सांगितली, चित्त भावें त्यानं ऐकली. त्याची लांकडाची मोळी होती, ती सोन्याची झाली. तो म्हणाला, "बाई बाई! कहाणी ऐकल्याचं एवढं फळं, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा." " तुला रे वसा कशाला हवा? उतशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील," उतत नाहीं, मातत नाहीं, घेतला वसा टाकीत नाहीं." तेव्हां वसा सांगितला.

पुढं दुसऱ्या मजलेस गेली. सैंपाक केला. राजाला वाढला, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं, तेव्हां कहाणीची आठवण झाली. " करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा. नगरांत कोणी उपाशी आहे का? याच शोध करा." "उपाशी नाहीं, कांहीं नाहीं" माळ्याचा मळा पिकत नाहीं, विहिरीला पाणी लागत नाहीं, असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हाक मारली. ‘आमच्या बाईची कहाणी ऐक." तो आला. राणीनं सहा मोत्यें घेऊन तीन आपण घेतलीं, तीन माळ्याला दिलीं. राणीनं कहाणी मनोभावें सांगितली. चित्तभावें माळ्यानं ऐकली. माळ्याचा मळा पिकूं लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, " बाई बाई! कहाणी ऐकल्यावर एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा." मग राणीनं त्याला वसा सांगितला.

पुढं तिसऱ्या मजलेस गेलिं. सैंपाक केला. राजाला वाढलं. मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं, तेव्हा कहाणीची आठवण झाली. " करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा. नगरांत कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा." "उपाशी नाहीं, कांहिं नाहीं." एक म्हातारी, तिचा एक मुलगा वनांत गेला होता, एक डोहांत बुडाला होता, एक सर्पानं खाल्ला होता, त्यामुळं चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, " आमच्या बाईची कहाणी ऐकू." ती म्हणाली, " कहाणी ऐकून मी काय करूं? मी मुलांसाठी रडातें आहें. बरं येतें" मग ती राणीकडे आली. राणीनं पहिल्याप्रमाणं तिला कहाणी सांगितली. तिनं चित्तभावें ऐकली. तिचा मुलगा वनांत गेला होता तो आला. डोहांत बुडाला होता तो आला. सर्पानं खाल्ला होता तो आला. ती म्हणाली," बाई बाई! कहाणी ऐकल्याचं हें फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा." मग राणीनं तिलाही वसा सांगितला.

पुढं चौथ्या मजलेस गेलीं. सैंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं, तेव्हां कहाणीची आठवण झाली. "करा रे हांकारा, पिटा रे डांगोरा. नगरांत कोणी उपाशी आहे का? याचा शोध करा." "उपाशी नाहीं, कांहीं नाहीं." काणा डोळा, मांसाचा गोळा, हात नाहीं, पाय नाहीं, असा एक मनुष्य रस्त्यामध्यें होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालथा होता तो उताणा केला. सहा मोत्यें होतीं. तीन मोत्यें त्याच्या बेंबीवर ठेवलीं, तीन मोत्यें आपण घेतलीं, राणीनं मनोभावे कहाणी सांगितली; ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले. देह दिव्य झाला. तो म्हणाला, "कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला.

पांचव्या मुक्कामाला घरीं आलीं. सैंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. साती दरवाजे उघडले. लोहघंगाळं पाणी तापवलं. पड्रस पक्कान्नं जेवायला केलीं. सूर्यनारायण भोजनाला बसले, त्यांना पहिल्या घांसाला केंस लागला. ते म्हणाले, "अग अग, कोणा पापिणीचा केंस आहे?" राजाच्या राणीला बारा वर्षं दरिद्र आलं होतं. तिनं आदितवारीं वळचणीखालीं बसून केस विंचरलें. "काळं चवाळं, डोईचा केंस; वळचणीची काडी, डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे." राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला, तसा कोणाला होऊं नये.

ब्राह्मणाला, मोळीविक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, कोणा डोळा मांसाचा गोळा, इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला, तसा तुम्हां आम्हां होवों. ही साठां उत्तराची कहाणी, पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

सोमवारची [ खुलभर दुधाची ] कहाणी

ऐक परमेश्वरा सोमवारा, तुमची कहाणी, आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. तो मोठा शिवभक्त होता. त्याच्या मनांत आलं आपल्या महादेवाचा गर्भारा दुधानं भरावा. परंतु हें घडेल कसं? अशी त्याला चिंता पडली. प्रधानानं युक्ति सांगितली. दवंडी पिटली, "गांवांतल्या सर्व माणसांनीं आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारीं महादेवाच्या देवळीं पूजेला यावं." सर्वांना धाक पडला. घरोघरचीं माणसं घाबरून गेलीं. कोणाला कांहीं सुचेनासं झालं. त्याप्रमाणं घरांत कोणीं दूध ठेवलं नाहीं. वासरांना पाजलं नाहीं, मुलांना दिलं नाहीं. सगळई दूध देवळांत नेलं. गांवचं दूध सगळं गर्भाऱ्यांत पडलं, तरी देवाचा गर्भारा भरला नाहीं.

दुपारी एक चमत्कार झाला. एक म्हातारी बाई होती, तिनं घरचं कामकाज आटपलं, मुलांबाळांना खाऊं घातलं, लेकिसुनांना न्हाऊं घातलं, गाईवासरांना चारा घातला. त्यांचा आत्मा थंड केला. आपल्या जिवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध व फूल घेतलं, चार तांदुळाचे दाणे घेतले, दोन बेलाचीं पानं घेतलीं, आणि खुलभर दूध घेतलं. बाई देवळांत आली. मनोभावें पूजा केली. थोडं दूध नैवेद्याला ठेवलं. देवाची प्रार्थना केली. " जय महादेवा, नंदिकेश्वरा, राजानं पुष्कळ दूध तुझ्या गर्भाऱ्यांत घातलं. तुझ्या गर्भारा भरला नाहीं, माझ्या खुलभर दुधानं भरणार नाही. पण मी आपली भावें भक्तीनं अर्पण करतें." असं म्हणून राहिलेलं दूध गर्भारीं अर्पण केलं. पूजा घेऊन मागं परतली. इकडे चमत्कार झाला. म्हातारी परतल्यावर गर्भारा भरून गेला. हें गुरवानं पाहिलं, राजाला कळवलं, परंतु त्याचा कांहीं केल्या पत्ता लागेना. दुसऱ्या सोमवारीं राजानं शिपाई देवळीं बसवले. तरीही शोध लागला नाहीं. चमत्कारही असाच झाला. पुढं तिसऱ्या सोमवारी राजा बसला. म्हातारीचे वेळेस गर्भारा भरला. राजानं तिचा हात धरल. म्हातारी घाबरून गेली. तिला अभयवचन दिलं. तिनं कारण सांगितलं. "तुझ्या आज्ञेनं काय झालं? वासरांचे, मुलांचे आत्मे तळमळले, मोठ्या माणसांचे हायहाय माथीं आले. हें देवाला आवडत नाहीं, म्हणुन गर्भारा भरत नाहीं." "याला युक्ति काय करावी?" "मुलांवांसरांना दूध पाजावं. घरोघर सगळ्यांनीं आनंद करावा. देवाला भक्तीनं पंचामृती स्नान घालावं. दुधाचा नैवेद्य दाखवावा; म्हणजे देवाचा गर्भारा भरेल. देव संतुष्ट होईल." म्हातारीला सोडून दिलं. गांवांत दवंडी पिटविली.

चवथ्या सोमपारीं राजानं पूजा केली. मुलांबाळांना गाईवासरांना दूध ठेऊन उरलेलं दूध देवाला वाहिलं. हात जोडून प्रार्थना केली. डोळे उघडून पाहातात तों देवाचा गर्भारा भरून आला. राजाला आंनद झाला. म्हातारीला इनाम दिलं. लेकी. सुना घेऊन म्हातारी सुखानं नांदूं लागली.

तसं तुम्ही आम्ही नांदूं. ही साठां उत्तरांची कहाणी, पांचांउत्तरी सुफळ संपूर्ण.

(तात्पर्य : जो माणुस आपल्या माणसांचा प्रतिपाळ नीट रीतीनें करून देवाला भजतो, तोच देवाला आवडतो.)


सोमवारची [ शिवामुठीची ] कहाणी

आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला चार सुना होत्या. तीन आवडत्या होत्या, एक नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीला जेवायला उष्टं, नेसायला जाडंभरडं. राहायला गुरांचं बेडं दिलं. गुराख्याचं काम दिलं. पुढं श्रावणमास आला. पहिला सोमवार आला. ही रानीं गेली. नागकन्या-देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, "बाई बाई, कुठं जातां?" " महादेवाच्या देवळीं जातों, शिवामूठ वाहतों." "यानं काय होतं?" "भ्रताराची भक्ति होते. इच्छित कार्य सिद्धीस जातं. मुलंबाळं होतात. नावडतीं माणसं आवडतीं होतात. वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ति होते." मग त्यानीं हिला विचारलं, "तूं कोणाची कोण?" "म राजाची सून, तुमच्याबरोबर यीं." त्यांचेबरोबर देवळांत गेली.

नागकन्या-देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती म्हणाली, "काय ग बायांनो वसा वसतां?" " आम्ही शिवामुठीचा वसा वसतों." "त्या वशाला काय करावं?" "मूठ चिमुट तांदुळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्याई, गंध फूल घ्यावं, दोन बेलाचीं पानं घ्यावीं. मनोभावं पूजा कराई. हाटीं तांदूळ घ्यावए आणि तोंडानं "शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा." असं म्हणून तांदूळ वहावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टंमाष्टं खाऊं नये. दिवसा निजूं नये. उपास नाहीं निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळीं आंघोळ करावी. देवाला बेल वहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा पांच वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चवथ्यास जव आणि पांचवा आला तर सातू शिवामूठीकरितां घेत जावे."

पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या-देवकन्यांनीं दिलं, आणि दुसऱ्या सोमवारी हिला धरून आणायला संगितलं. त्या दिवशीं हिनं मनोभावं पूजा केली. सारा दिवस उपास केला. जावानणंदांनीं उष्टंमाष्टं पान दिलं. तें तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढं दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरांतून सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानांत जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावें पूजा केली आणि "शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा नावडती आहें ती आवडती कर रे देवा." असं म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळीं सासऱ्यानं विचारलं. "तुझा देव कुठं आहे? नावडतीनं जबाब दिला, "माझा देव फार लांब आहे. वाटा कठीण आहेत, कांटेकुटे आहेत. साप-वाघ आहेत, तिथं माझा देव आहे." पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊं लागली. घरचीं माणसं मागं चाललीं. "नावडते, तुझा देव दाखव," म्हणून म्हणूं लागलीं. नावडतीला रोजचा सराव होता. तिला कांहीं वाटलं नाहीं. ह्यांना कांटेकुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानांत कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या, देवकन्या ह्यांसहवर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले, हांड्या गलासं लागलीं. स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनीं देवाचं दर्शन घेतलं. नावडाती पूजा करूं लागली. गंधफूल वाहूम लागली. नंतर मूग घेऊन "शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा, नावडती आहें ती आवडती कर रे देवा." असं म्हणून शिवाला वाहिलें. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं. दागिने ल्यायला दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळं पहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळीं माणसं बाहेर आलीं. इकडे देऊळ अदृश्य झालं. राजा परत आला. माझं पागोटं देवळीं राहिलं देवळाकडे आणायला गेला. तों तिथं एक लहान देऊळ आहे, तिथं एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे, जवळ खुंटीवर पागोटं आहे. तेव्हां त्यांने सुनेला विचारलं, " हें असं कसं झालं?" "माझा गरिबाचा हाच देव. मीं देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हांला दर्शन दिलं." सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखींत घालून घरीं आणलं. नावडती होती ती आवडती झाली.

जसा तिला शंकर प्रसन्न झाला, तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी. पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.

सोमवारची [ साधी ] कहाणी

आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्याचा एक शिष्य होता. तो रोज तळ्यावर जाई, स्नान करी, शंकराची पूजा करी. वाटेंत वेळूचं बेट होतं. परत येऊं लागला, म्हणजे "मी येऊं? मी येऊं?" असा ध्वनि उठे. हा मागं पाही, तों तिथं कोणी नाहीं. त्या भीतीनं वाळूं लागला. तेव्हां गुरुजींनीं विचारलं, "खायला प्यायला वाण नाहीं. मग बाबा, असा रोड कां?" "खायला प्यायला वाण नाहीं हाल नाहीं, अपेष्टा नाहीं. स्नान करून येतेवेळेस मला कोणी ‘मी येऊं? मी येऊं? असं म्हणतं. मागं पाहतों तों कोणी नाहीं. ह्याची मला भिती वाटतें." गुरुजी म्हणाले, "भिऊं नको, मागं कांहीं पाहूं नको. खुशाल त्याला ये म्हण, तुझ्यामागून येऊं दे."

मग शिष्यानं काय केलं. रोजच्याप्रमाणं स्नानास गेला. पूजा करून येऊं लागला. "मी येऊं?" असा ध्वनि झाला. "ये ये" असा जवाब दिला. मागं कांहीं पाहिलं नाहीं. चालत्या पावलीं घरीं आला. गुरुजींनीं पाहिलं, बरोबर एक मुलगी आहे. त्या दोघांचं लगीन लावलं. त्यांना एक घर दिलं.

त्यानंतर काय झालं. श्रावणी सोमवार आला. बायकोला म्हणूं लागला, "माझी वाट पाहू नको, उपाशी राहूम नको." आपण उठला. शंकराचे पूजेला गेला. तिनं थोडी वाट पाहिली. सैंपाक करून जेवायला बसली. एक घास तोंडात घातला. इतक्यामधें पति आला. "अग अग, दार उघड." पुढचं ताट पलंगाखालीं ढकलून दिलं. हात धुतला. दार उघडलं. पति घरांत आले. नित्य नेम करूं लागले. पुढं दुसरा सोमवार आला. त्या दिवशींही असंच झालं. असं चारी सोमवारीं झालं.

सरता सोमवार आला. रात्रीं नवल झालं. दोघंजणं पलंगावर गेलीं. पलंगाखालीं उजेड दिसला. "हा उजेड कशाचा?" "ताटी भरल्या रत्नांचा." "हीं रत्नें कुठून आणली?" मनांत भिऊन गेली. "माझ्या माहेरच्यांनीं दिलीं." " तुझं माहेर कुठं आहे?" "वेळूच्या बेटीं आहे." "मला तिथं घेऊन चल." पतीसह चालली. मनीं शंकराची प्रार्थना केली. "मला अर्धघटकेचं माहेर दे." तों वेळूचं बेट आलं. मोठा एक वाडा आला. कोणी म्हणे माझा मेहुणा आला, कोणी म्हणे माझा जावई आला, कोणि म्हणे नणंद आली, कोणी म्हणे माझी बहीण आली. दासी बटकी राबताहेत. शिपाई पाहारा करताहेत. बसायला पाट दिला. भोजनाचा थाट केला. जेवणं झालीं. सासूसासऱ्यांचीं आज्ञा घेतली. घरीं परतलीं. अर्ध्या वाटेत आठवण झाली, खुंटीवर हार राहिला. तेव्हां उभयतां परत गेलीं. घर नाहीं, दार नाहीं. शिपाई नाहींत, प्यादे नाहींत, दासी नाहींत. बटकी नाहींत. एक वेळूचं बेट आहे. तिथं हार पडला आहे. हार उचलून गळ्यांत घातला. नवऱ्यांनं विचारलं, "इथलं घर काय झालं?" "जसं आलं तसं गेलं. अभाय असेल तर सांगतें. चाई सोमवारीं हांक ऐकली. जेवतीं ताटं ढकलून दिलीं. रत्नानीं भरलीं. सोन्याची झालीं. तीं मल देवांनीं दिलीं. आपण विचारूं लागला तेव्हां भिऊन गेलें. माहेरची म्हणून सांगितलं. शंकराची प्रार्थना केली. अर्धघटकेचं माहेर मागितलं. त्यांनीं तुमची खात्री केलीं. माझी इच्छा परिपूर्ण झाली."

जसा त्यांना शंकर पावला, तसा तुम्हां आम्हां पावो ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

( तात्पर्य : देव भक्ताचा पाठीराखा असतो.)

सोमवारची [ फसकीची ] कहाणी

सोमवारची [ फसकीची ] कहाणी

ऐका महादेवा, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्यांत एक गरीब सवाशीन बाई रहात असे. तिनं आपलं श्रावणास आला म्हणजे काय करावं? आपलं दर सोमवारीं पहाटेस उठावं, स्नानं करावं, पूजा घ्यावी, एक उपडा, दुसरा उताणा, पसाभर तांदूळ घ्यावे व महादेवाच्या देवळीं जाऊन मनोभावें पूजा करावी. नंतर प्रार्थनेच्या वेळीं, ‘जय महादेवा; घे फसकी व दे लक्ष्मी’ असं म्हणून महादेवाच्या मस्तकीं तांदूळ अर्पण करावे. उरले तांदूळ नंदीच्या पाठीवर वाहून आपण घरी यावं. असं चारी सोमवारीं तिनं केलं. शंकर तिला प्रसन्न झाला. दिवसेंदिवस ती श्रीमंत झाली. मनामध्ये समाधान पावली. पुढं उद्यापनाचे वेळीं तिनं देवी अन्नपूर्णेला गजनीची चोळी पाठवली, काशीविश्वेश्वराला रुपया पाठवला आणि व्रताची समाप्ति केली. शंकरांनीं तिला निरोप पाठविला . "अजून तुला, नंदीच्या सेवेचं फळ मिळालं नाहीं, माझ्या सेवेचं तर अद्याप देणंच आहे." पुढं शंकरांनीं तिला अपार देणं दिलं.

तर जसा तिला विश्वेश्वर प्रसन्न झाला, तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरीं सुफळ संपूर्ण.

नागपंचमीची कहाणी

नागपंचमीची कहाणी

ऐका नागोबा देवा, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला पांच सुना होत्या. चातुर्मास्यांत श्रावणमास आला आहे, नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळीं, कोणी आपल्या पणजोळी, कोणी माहेरीं, अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वांत धाकटी सून होती तिच्या माहेरचं कोणीचं नव्हतं. तेव्हां ती जरा खिन्न झाली व मनांत माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून, नागोबा मला माहेराहून न्यावयास येईल, असं म्हणूं लागली. इतक्यांत काय झालं? शेषभगवानास तिचीं करुणा आली. त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला. त्या मुलीला नेण्याकरितां आला. ब्राह्मण विचारांत पडला. हा इतके दिवस कुठं लपून राहिला? व आतांच कुठून आला? पुढें त्यानं मुलीला विचारलं. तिनंही हाच माझा मामा असं सांगितलंः ब्राह्मणानं तिची रवानगी केलीं. त्या वेषधारी मामानं तिला आपल्या वारुळांत नेलं, खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवा बसवून आपल्या बिळांत घेऊन गेला. आपल्या बायकांमुलांना ताकीद दिली कीं, हिला कोणीं चावूं नका.

एके दिवशीं नागाची नागीण बाळंत होऊं लागली, तेव्हां हिला हातांत दिवा धरायला सांगितलं. पुढं ती व्याली, तिचीं पिलं वळवळ करूं लागली. ही मुलगी भिऊन गेली. हातांतला दिवा खालीं पडला. पोरांची शेपूटं भाजलीं. नागीण रागावली. तिनं सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली, तो म्हणाला, "तिला लौकरच सासरीं पोंचवूं." पुढं तीं पूर्ववत आनंदानं वागूं लागलीं. एके दिवशीं मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्यदेह धारण करून तिला सासरीं पावती केली. नागाचीं पोरं मोठीं झालीं. आपल्या आईपाशीं चौकशी केली. आमचीं शेपूटं कशानं तुटलीं? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यास फार राग आला, त्याचा सूड घ्यावा म्हणून ते हिच्या घरीं आले. नागपंचमीचा दिवस. हिनं आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली. ते येत नाहींत म्हणून पाटावर व भिंतीवर नागांची चित्रं काढलीं. त्यांची पूजा केली. जवळ नागांना, लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांचीं पिलं पहात होतीं. सरतेशेवटीं तिनं देवाची प्रार्थना केली. "जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत." असं म्हणुन नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार त्यांनीं पाहून मनांतील सर्व राग घालविला. मनांत तिजविषयीं दया आली. पुढं त्या दिवशीं तिथं वस्ती केली. दूध पाणी ठेवतात त्यांत पहांटेस एक नवरत्नांचा हाअ ठेवून आपण निघून गेले. दुसऱ्या दिवशीं तिनं हार उचलून गळ्यांत घातला.

तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला, तसा तुम्हांआम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण!

नागपंचमीची [ शेतकऱ्याची ] कहाणी

आटपाट नगर होतं. तिथं एक शेतकरी होता, त्याच्या शेतांत एक नागाचं वारूळ होतं. श्रावणमास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. शेतकरी आपला नित्याप्रमाणं नांगर घेऊन शेतांत गेला. नांगरतां नांगरतां काय झालं? वारूळांत जीं नागांची नागकुळां होतीं, त्यांना नांगराचा फाळ लागला. लौकरच तीं मेलीं. कांहीं वेळानं नागीण आली, आपलं वारूळ पाहूं लागली, तो तिथं वारूळ नाहीं आणि पिलंही नाहींत. इकडे तिकडे पाहूं लागली, तेव्हां नांगर रक्तानं भरलेला दिसला. तसं तिच्या मनांत आलं, ह्याच्या नांगरानं माझीं पिलं मेलीं. तो रोष मनांत ठेवला. शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनांत आणलं. फोफावतच शेतकऱ्याचे घरी गेली. मुलांबाळांना, लेकीसुनांना, शेतकऱ्याला व त्याच्या बायकोला दंश केला. त्याबरोबर सर्वजणं मरून पडली.

पुढं तिला असं समजलं कीं, ह्यांची एक मुलगी परगांवीं आहे, तिला जाऊन दंशा करावा म्हणून निघाली. ज्या गांवी मुलगीं दिली होती त्या ठिकाणी आली, तों त्या घरीं बाईनं पाटावर नागनागीण, नऊ नागकुळं काढलीं आहेत, त्यांची पूजा केली आहे, दुधाचा नैवेद्य दाखविला आहे. नागाणे, लाह्या, दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत. मोठ्या आनंदानं पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनांत आनंदानं लोळली. इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे. इतक्यांत नागीण उभी राहिली. तिला म्हणूं लागली, "बाई बाई तूं कोण आहेत? तुझी आईबापं कुठं आहेत?" इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडले. पाहाते तों प्रत्यक्ष नागीण दृष्टीस पडली. बाई बिचारी भिऊं लागली. नागीण म्हणाली. " भिऊं नको, घाबरूं नको, विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे." तिनं आपली सर्व हकीकत सांगितली, ती ऐकून नागिणीला फार वाईट वाटलं. ती मनांत म्हणाली, ‘ही आपल्याला इतक्या भक्तीनें पुजते आहे, आपलं मत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनांत आणलं आहेम हें चांगलं नाहीं." असं म्हणून सांगितली, तिनं ती ऐकली, वाईट वाटलं. तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिनं तिला अमृत दिलं, ते घेऊन त्याच पावलीं ती माहेरीं आली. सगळ्या माणसांच्या तोंडांत अमूत घातलं. सगळीं माणसं जिवंत झालीं. सगळ्यांना आनंद झाला.

बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हां बापानं विचारलं, " हें व्रत कसं करावं?" मुलीनं व्रताचा सगळा विधि सांगितला व शेवटीं सांगितलं कीं, " इतकं कांहीं झालं नाहीं तर निदान इतकं तरी पाळावं. नागपंचमीचे दिवशी जमीन खणूं नये. भाज्या चिरूं नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊं नये. नागोबाला नमस्कार करावा." असं सांगितलं, तेव्हापासून तो नागपंचमी पाळूं लागला.

जशी नागीण तिला प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो, ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरीं सुफळ संपूर्ण.

(तात्पर्य : किती दुष्ट प्राणी असला आणि त्याची जर आपण मनोभावे चांगली आराधना केली, तर तो संतुष्ट झाल्यावाचून रहाणार नाही.)

मंगळागौरीची कहाणी

आटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला कांहीं मुलगा नव्हता. त्याच्या घरीं एक गोसावी येई. अल्लख म्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. “निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही,” असें म्हणून तो चालता होई. ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली. त्यानं तिला युक्ति सांगितली. “दाराच्या आड लपून बस, अल्लख म्हणतांच सुवर्णाची भिक्षा घाल.” अशी भिक्षा झोळींत घातली. बोवाचा नेम मोडल. बाईवर फार रागावला. मूलबाळ होणार नाहीं असा शाप दिला. तिनं त्याचे पाय धरले. बोवांनी उःशाप दिला. बोवा म्हणालें, “आपल्या नवऱ्याला सांग. निळ्या घोड्यावर बस. निळा वस्त्रं परिधान कर. रानांत जा. जिथं घोडा अडेल तिथं खण. देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर. ती तुला पुत्र देईल.” असं बोलून बोवा चालता झाला. तिअं आपल्या पतीला सांगितलं. वाणी रानांत गेला. घोडा अडला, तिथं खणल. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे. हिरेजडिताचे खांब आहेत. माणकांचे कळस आहेत. आंत देवीची मूर्ती आहे. मनोभावें पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली, “वर माग” म्हणाली. “घरंदारं आहे, गुरंढोरं आहेत. धन द्रव्य आहे; पोटीं पुत्र नाहीं, म्हणून दुःखी आहे.” देवी म्हणाली, “तुला संततीचं सुख नाहीं, मी प्रसन्न झालें आहे तर तुला देतें. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी घेतलास तर जन्मांध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल तें मागून घे.” त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला. देवीनं “माझ्या मागच्या बाजूस जा. तिथं एक गणपति आहे. त्याच्यामागं आंब्याचं झाड आहे, गणपतीच्या दोंदावर पाय दे, एक फळ घे, घरीं जाऊन बायकोला खाऊं घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल.” असं सांगितलं. नंतर देवी अदृश्य झाली.

वाणी देवळामागं गेला, गणपतीच्या दोंदावर पाय दिला, झाडावर चढला; पोटभर आंबे खाल्ले; मोटभर घरीं नेण्याकरितां घेतले. खालीं उतरून पाहूं लागला, तों आपल्या मोटेंत आंबा एकच आहे. असं चार पांच वेळां झालं. गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, “तुझ्या नशिबीं एकच फळ आहे.” फळ घेऊन घरीं आला, बायकोला खाऊं घातलं, ती गरोदर राहिली. दिवसमासां गर्भ वाढू लागला. नवमास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसामासां वाढूं लागला. आठव्या वर्षी मुंज केली. दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशीयात्रेशिवाय लग्न करणं नाहीं असा माझा नवस आहे. असा जबाब दिला. कांहीं दिवसांनीं मामाबरोबा यात्रेस पाठविलं. मामाभाचे काशीला जाऊं लागले. जातां जातां काय झालं? वाटेनं एक नगर लागलं. तिथं कांहीं मुली खेळत होत्या. त्यांत एकमेकीचं भांडण लागलं. एक गोरी भुरकी मुलगई होती, तिला दुसरी मुलगी म्हणूं लागली, “काय रांड द्वाड आहे! काय रांड द्वाड आहे! तेव्हां ती मुलगी म्हणाली, ‘माझी आई मंगळागौरीचं व्रत करतए, आमच्या कुळवंशामध्ये कोणी रांड होणार नाहीं. मग मी तर तिची मुलगी आहे.” हें भाषण मामानं ऐकलं त्याच्या मनांत आलं हिच्याशीं भाच्याचं लगीन करावं, म्हणजे हा दीर्घायुषी होईल. परंतु हें घडतं कसं? त्याच दिवशीं तिथं त्यांनीं मुक्काम केला.

इकडे काय झालं? त्याच दिवशीं त्या मुलीचं लग्न होतं. लग्नाचे वेळेस नवरा मुलगा आजारी झाला. मुलाच्या आईबापांना पंचाईत पडली. पुढं कोणी तरी प्रवासी मिळेल तर बरं होईल, त्याला पुढं करून वेळ साजरी करूं, म्हणून धर्मशाळा पाहूं लागले. मामाभाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोरज लग्न लाविलं. उभयतांना गौरीहरापाशी निजवलं. दोघं झोंपीं गेलीं. मुलीला देवीनं दृष्टांत दिला. “अग अग मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल, त्याला पिण्याकरितां दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प कऱ्यांत शिरेल. आंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळीं उठून आईला तें वाण दे.” तिनं सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणं घडून आलं. कांहीं वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणूं लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली आंगठी दिली. पहाटेस उठून ताट घेऊन बिऱ्हाडीं गेला. मामाभाचे मार्गस्थ झाले.

दुसरे दिवशीं काय झालं? हिनं सकाळीं उठऊन स्नान केलं, आपल्या आईल वाण दिलं. आई उघडून पाहूं लागली, तों आंत हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यांत हार घातला. पुढं पहिला वर मांडपांत आला. मुलीला खेळयला आणलं. ती म्हणाली, “हा माझा नवरा नाहीं. मी त्याचे बरोबर खेळत नाहीं.” रात्रींची लाडवांची व आंगठीची खूण कांहीं पटेना. आईबापांणा पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सांपडतो? नंतर त्यांनीं अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय आंगठी घालून मुलीनं धुवावे, आईनं पाणी घालावं, भावानं गंध लावावं, आणि बापानं विडा द्यावा, असा क्रम चालू केला, शेंकडों लोक येऊन जेवूं लागले.

इकडे मामाभाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केला. तीर्थयात्रा केल्या. ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्याला मूर्च्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी झाली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तिथं अदृश्य झाली. भाचा जागा झाला, तसा आपल्या मामाला सांगूं लागला, “मला असं असं स्वप्न पडलं.” मामा म्हणाला, “ठीक झालं. तुझावरचं विघ्न टळलं. उद्यां आपण घरीं जाऊं.” परत येऊं लागले. लग्नाच्या गांवीं आले. तळ्यावर स्वयंपाक करूं लागले. दासींनीं येऊन सांगितलं. “इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा.” ते म्हणाले, “आम्ही परान्न घेत नाहीं.” दासींनीं यजमानणीस सांगितलं. त्यांनीं पालखी पाठवली. आदरातिथ्यानं घरी नेलं. पाय धुतांना मुलीनं नवऱ्याला ओळखलं. नवऱ्यानं आंगठी ओळखली. आईबापांनीं विचारलं. “तुझ्याजवळ खूण काय आहे?” त्यांनं लाडवांचं ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला. भोजनसमारंभ झाला. मामाभाचे सून घेऊन घरीं आले. सासूनं सुनेचे पाय धरले. “तुझ्यामुळं माझा मुलगा वांचल,” असं म्हणाली. तिनं सांगितलं. “मला मंगळागौरीचं व्रत असतां. ही सगळी तिची कृपा.” सासर माहेरचीं घरचींदारचीं माणसं सर्व एकत्र झाली, आणि त्या व्रताचं उद्यापन केलं.

तिला जशी मंगळागौरी प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो, आणि आपलं सौभाग्य अखंड राहो, इतकीच देवाची प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरईं सुफळ संपूर्ण.

ज्येष्ठागौरीची कहाणी

आटपाट नगर होते, तिथं एक गरीब ब्राह्मण राहात होता. पुढं एके दिवशी काय झालं? भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनीं गौरी आणल्या. रस्तोरस्तीं बायका दृष्टीला पडूं लागल्या. घंटा वाजूं लागल्या. हें त्या ब्राह्मणाच्या मुलांनीं पाहिलं. मुलं घरी आलीं. आईला सांगितलं, “आई, आई, आपल्या घरी गौरी आण.” आई म्हणाली, “बाळांनो गौर आणून काय करूं? तिची पुजापत्री केली पाहिजे, घावनघाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरांत तर कांहीं नाहीं. तुम्हीं बाबांजवळ जा, बाजारांतलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर आणीन.” मुलें तिथून उठलीं, बापाकडे आलीं “बाबा, बाबा, बाजारांत जा. घावनघाटल्याचं सामान आणा. म्हणजे आई गौर आणील.” बाबानं घरांत चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनांत फार दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांच हट्ट पुरवत नाहीं. गरिबीपुढं उपाय नाहीं. मागायला जावं तर मिळत नाहीं. त्यापेक्षा मरण बरं. म्हणून उठला, देवाचा धंवा केला. तळ्याच्या पाळीं गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला, अर्ध्या वाटेवर गेला. इतक्यांत संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीणं भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं समाधान केलं. बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरीं आणलं. बायकोनं दिवा लावला, चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरांत गेली. आंबिलीकरितां कण्या पाहूं लागली, तो मडकं आपलं कण्यांनीं भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेज केली, सगळ्यांनीं पोटभर खाल्ली, सगळींजणं आनंदानं निजलीं. सकाळ झाली, तशी म्हातारीनं ब्राह्मणास हांक मारली, “मुला मुला, मला न्हाऊ घालायला सांग.” म्हणून म्हणाली, “घावनघाटलं देवाला कर नाहीं कांहीं म्हणूं नको. बायकोला हांक मारली, “अग अग ऐकलसं का? आजीबाईला न्हाऊं घाल” असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपातून गूळ मिळाला. सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलांबाळांसुद्धां पोटभर जेवलीं. म्हातारीनं ब्राह्मणाला हांक मारली. “उद्यां जेवायला खीर कर” म्हणून सांगितलं, ब्राह्मण म्हणाला, “आजी, आजी, दूध कोठून आणू?” तशी म्हातारी म्हणालीं, “तूं कांहीं काळजी करूं नको. आतां उठ, आणि तुला जितल्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटे पूर. तितक्यांना दावीं बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई-म्हशींची नांवं घेऊन हांकां मार, म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्यांचं दूध काढ.” ब्राह्मणानं तसं केलं. गाईम्हशींना हांका मारल्या त्या वांसरांसुद्धां धांवत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाईम्हशींनीं भरून गेला. ब्राह्मणानं त्यांचं दूध काढलं, दुसऱ्या दिवशीं खीर केली. संध्याकाळ झाली, तशी म्हातारी म्हणाली,“ मुला मुला, मला आतां पोंचती कर.” ब्राह्मण म्हणूं लागला, “आजी आजी, तुमच्या कृपेनं मला सगलं प्राप्त झालं, आतां तुम्हांला पोंचत्या कशा करूं? तुम्ही गेलां म्हणजे हें सर्व नाहीसं होईल.” म्हातारी म्हणाली. “तूं कांहीं घाबरूं नको, माझ्या आशीर्वादानं तुला कांहीं कमी पडणार नाहीं. ज्येष्ठागौर म्हणतात ती मीच. आज मला पोंचती कर.” ब्राह्मण म्हणाला, “हें दिलेलं असंच वाढावं असा कांहीं उपाय सांगा.” गौरीनं सांगितलें, “तुला येतांना वाळू देईन. ती साऱ्या घरभर टाक. हांड्यावर टाक, मडक्यावर टांक, पेटींत टाक, फडताळांत टाक, गोठ्यांत टाक. असं केलं म्हणजे कधीं कमी होणार नाहीं” ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं, भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळीं जावं, दोन खडे घरीं आणावे. ऊन पाण्यानं धुवावे. ज्येष्ठागौर व कनिष्ठागौर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशीं घावनगोडं, तिसरे दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीची ओटी भरावी. जेवूं घालावं. संध्याकाळीं हळदकुंकू वाहून बोळवण करावी. म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल. संतत संपत मिळेल.

ही सांठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरीं, देवाच्या दारीं, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारीं, सुफळ संपूर्ण.

ऋषिपंचमीची कहाणी

एका ऋषीश्वरांनो; तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. तो आपला शेतीभाती करून सुखानं नांदत होता. पुढं एके दिवशीं काय झालं? त्याची बायको शिवेनाशी झाली, विटाळ तसाच घरांत कालविला. त्या दोषानं काय झालं? तिचा नवरा पुढच्या जन्मीं बैल झाला. त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म झाला. देवाची करणी! दोघंहि आपल्या मुलाच्या घरीं होतीं. तो मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्धपक्ष करी. आल्या ब्राह्मणांचा समाचर घेई. एके दिवशीं त्याच्या घरीं श्राद्ध आलं. बायकोला सांगितलं, “आज माझ्या बापाचं श्राद्ध आहे. खीरपुरीचा सैंपाक कर.” ती मोठी पतिव्रता होती. तिनं चार भाज्या, चार कोशिंबिरी केल्या. खीरपुरीचा सैंपाक केला. इतक्यांत काय चमत्कार झाला? खिरीचं भांडं उघडं होतं त्यांत सर्पानं आपलं गरळ टाकलं. हें त्या कुत्रीनं पाहिलं. मनांत विचार केला, ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील. मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल. म्हणून उठली. पटकन खाऊन खिरींच्या पातल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिनं जळतं कोलीत घेतलं. नि कुत्रीच्या कंबरेंत मारलं. तो सैंपाक टाकून दिला. पुन्हा सैंपाक केला. ब्राह्मणांना जेवूं घातलं. कुत्रीला कांहीं उष्टंमाष्टं देखील घातलं नाहीं. सारा दिवस उपास पडला. रात्र झाली तेव्हां ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली, आणि आक्रोश करून रडूं लागली. बैलानं तिला कारण विचारलं. ती म्हणाली, “मी उपाशी आहे. आहे मला अन्न नाहीं, पाणी नाहीं, खिरीच्या पातेल्यांत सर्पानं गरळ टाकलं, तें माझ्या दृष्टीस पडलं. ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्याला शिवलें. माझ्या सुनेला राग आला. तिनं जळतं कोलीत माझी कंबर मोडली. माझं सारं अंग दुखतं आहे. ह्याला मी काय करूं?” बैलानं तिला उत्तर दिलं, “तूं आदल्या जन्मीं विटाळशीचा विटाळ घरांत कालविलास, त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषानं मी बैल झालों. आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं, तोंड बांधून मला मारलं, मी देखील आज उपाशीच आहे. त्याचं श्राद्ध फुकट गेलं.” हें भाषण मुलानं ऐकलं. लागलाच उठऊन बाहेर आला. बैलाला चारा घातला. कुत्रीला अन्न घातलं, दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं. मनांत फार दुःखी झाला.

दुसरे दिवशीं सकाळीं उठला, घोर अरण्यांत गेला. तिथं ऋषींचा मेळा पाहिला. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याला प्रश्न केला, “तुं असा चिंताक्रांत कां आहेस?” मुलानं सांगितलं, “माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे, आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल? ह्या चितंत मी पडलों आहे. कृपा करून मला उपाय सांगा.” तेव्हां ऋषींनीं सांगितलं, “तूं ऋषिपंचमीचं व्रत कर. तें व्रत कसं करावं? भाद्रपद महिना येतो. चांदण्या पाखांतली पंचमी येते. त्या दिवशीं काय करावं? ऐन दुपारच्या वेळीं नदीवर जावं आघाड्याची प्रार्थना करावी, त्याच्या काष्ठानं दंतधावन करावं, आंवळकाठीं कुटून घ्यावी, तीळ वाटून घ्यावे. केसांना लावावे, मग आंघोळ करावी, धुतलेलीं वस्त्रें नेसावीं. चांगल्या ठिकाणीं जावं. अरुंधतीसह सप्तऋषींचीं पूजा करावी. असं सात वर्ष करावं. शेवटीं उद्यापन करावं. ह्या व्रतानं काय होतं? रजस्वलादोष नाहींसा होतो, पापापासून मुक्तता होते. नाना तीर्थांच्या स्नानाचं पुण्य लागतं. नानाप्रकारच्या दानांचं पुण्य लागतं. मनीं इच्छिलं कार्य होतं.” मुलानं तें व्रत केलं. त्याचं पुण्य आपल्या आईबापांस दिलं. त्या पुण्यानं काय झालं? रजोदोष नाहींसा झाला. आकाशांतून विमान उतरलं. बैल होता तो सुंदर पुरुष झाला. कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली. दोघं विमानांत बसून स्वर्गाला गेलीं.

मुलाचा हेतु पूर्ण झाला, तसा तुमचा आमचा होवो. ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरईं सुफळ संपूर्ण.

सोळा सोमवारांची कहाणी

आटपाट नगर होतं. त्या नगरांत एक महादेवाचं देऊळ होतं. एके दिवशीं काय झालं? शिवपार्वती फिरतां फिरतां त्या देवळांत आलीं. सारीपाट खेळूं लागलीं. “डाव कोणी जिंकला?” म्हणून पार्वतीनं गुरवाला विचारलं. त्यानं शंकराचं नांव सांगितलं. पार्वतीला राग आला. गुरवाला “तूं कोडी होशील” म्हणून शाप दिला. तशा त्याला असह्य वेदना होऊं लागल्या. पुढें एके दिवशी काय झालं? देवळीं स्वर्गीच्या अप्सरा आल्या. त्यांनी गुरव कोडी पाहिला. त्याला कारण पुशिलं गुरवानं गिरिजेचा शाप सांगितला. त्या म्हणाल्या, “भिऊं नको. घाबरूं नको. तूं सोळा सोमवारांचं व्रत कर, म्हणजे तुझं कोड जाईल.” गुरव म्हणाला “ तें व्रत कसं करावं?” अप्सरांनीं सांगितलं, “सारा दिवस उपास करावा. संध्याकाळीं आंघोळ करावी. शंकराची पूजा करावी. नंतर अर्धा शेर कणीक घेऊन त्यांत तूप गूळ घालावा व तें खावं. मीठ त्या दिवशीं खाऊं नये. त्याप्रमाणं सोळा सोमवार करावे. सतरावे सोमवारीं पांच शेर कणीक घ्यावी, त्यांत तूप गूळ घालून चूर्मा करावा,. तो देवळीं न्यावा. भक्तीनं शंकराची षोडशोपचारे पूजा करावी. नंतर चुर्म्याचा नैवद्य दाखवावा. पुढं त्याचे तीन भाग करावे. एक भाग देवाला द्यावा. दुसरा भाग देवळीं ब्राह्मणांना वांटाचा किंवा गाईला चारावा, तिसरा भाग आपण घरीं घेऊन जाऊन सहकुटुंबी भोजन करावं.” असं सांगून त्या नाहीशा झाल्या. पुढं गुरवानं तें व्रत केलं, गुरव चांगला झाला.

पुढं कांहीं दिवशंनीं शंकरपार्वती पुन्हां त्या देउळीं आलीं. पार्वतीनं गुरवाला कुष्ठरहित पाहिलं. तिनं गुरवाला विचारलं, “तुझं कोड कशानं गेलं?” गुरवानं सांगितलं, “मीं सोळा सोमावारांचं व्रत केलं, त्यानं माझं कोड गेलं” पारवतीला आश्चर्य वाटलं. तिनं आपला रागावून गेलेला मुलग कार्तिकस्वामी परत यावा म्हणून हें व्रत केलं. समाप्तीनंतर कार्तिकस्वामी लागलीच येऊन भेटला. दोघांना आनंद झाला. त्यानं आईला विचारलं “आई, आई, मी तर तुझ्यावर रागावून गेलों होतों आणि मला पुन्हां तुझ्या भेटीची इच्छा झाली, याचं कारण काय?” पार्वतीनं त्याला सोळा सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला. पुढें कार्तिकस्वामीनं तें व्रत केलं.
त्याचा एक ब्राह्मण मित्र फार दिवस देशांतराला गेला होता त्याची व ह्याची सहज रस्त्यांत भेट झाली.पुढें कार्तिकस्वामींनं हे व्रत त्या ब्राह्मणाला सांगितलं. त्यानं लग्नाचा हेतु मनांत धरला. मनोभावें सोळा सोमवाराचं व्रत केलं. समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला. फिरतां फिरतां एका नगरांत आला. तिथं काय चमत्कार झाला? तिथल्या राजाच्या मुलीचं लग्न होतं. लग्नाला अनेक देशांचे राजपुत्र आले होते. मंडप चांगले सुशोभित केले आहेत. लग्नाची वेळ झाली आहे. पुढं राजानं हत्तिणीच्या सोंडेंत माळ दिली. माळ ज्याच्या गळ्यांत हत्तीण घालील, त्याला आपली मुलगी द्यायची असा राजाचा पन होता. तिथं आपला हा ब्राह्मण ती मौज पहायला गेला होता. पुढं कर्मधर्मसंयोगानं ती माळ हत्तिणीनं ह्याच ब्राह्मणाच्या गळ्यांत घातली, तशी राजानं आपली मुलगी त्याला दिली. दोघांचं लग्न लावलं व नवरानवरींची बोळावण केली.

पुढं काय झालं? राजाची मुलगी मोठी झाली. तशीं दोघं नवराबायको एका दिवशीं खोलींत बसलीं आहेत; तसं बायकोनं नवऱ्याला विचारलं, “कोणत्या पुण्यानं मी आपणांस प्राप्त झालें?” त्यानं तिला सोळा सोमवारांच्या व्रताचा महिमा सांगितला. त्या व्रताची प्रचीती पाहण्याकरितां पुत्रप्राप्तीचा हेतु मनांत धरला व तें व्रत ती करूं लागली. तसा तिला सुंदर मुलगा झाला. तो मोठा झाल्यावर त्यानं आईला विचारलं कीं,“मी कोणत्या पुण्यानं तुला प्राप्त झालीं?” तिनं त्याला व्रताचा महिमा सांगितला. त्यानं राज्यप्राप्तीची इच्छा मनांत धरली. तो व्रत करूं लागला व देशपर्यटनाला निघाला. इकडे काय चमत्कार झाला? फिरंता फिरंता तो एका नगरांत गेला. त्या राजाला मुलगा नव्हता, एक मुलगी मात्र होती. तेव्हां कोणीतरी एकादा सुंदर व गुणावान असा नवरामुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी, व राज्यही त्यालाच द्यावं, असा त्यानं विचार केला. अनायासं त्या पुत्राची गांठ पडली. राजानं त्याला पाहिलं. तों राजचिन्हं त्याच्या दृष्टीस पडली. राजानं त्याला आपल्या घरी आणलं. कन्यादान केलं व त्याला आपल्या राज्यावर बसवलं.

इतकं होत आहे तों ब्राह्मणाचा सतरावा सोमवार आला. ब्राह्मणपुत्र देऊळीं गेला. घरीं बायकोला निरोप पाठविला की, पांच शेर कणकीचा चुर्मा पाठवून दे. राणीनं आपला थोरपणा मनांत आणला. चुर्म्याला लोक हंसतील, म्हणून एका तबकांत पांचशें रुपये भरून ते पाठवून दिले. चुर्मा वेळेवर आला नाहीं, व्रतभंग झाला म्हणून देवाला राग आला. त्यानं राजाला दृष्टांत दिला. तो काय दिला? राणीला घरांत ठेवशील तर राज्याला मुकशील. दरिद्रानं पिडशील. असा शाप दिला. पुढं दुसरे दिवशीं ही गोष्ट राजानं प्रधानाला सांगितली. तो म्हणाला. “महाराज, राज्य हें तिच्या बापाचं. आपण असं करू लागलों तर लोक दोष देतील, याकरितां असं करणं अयोग्य आहे.” राजा म्हणाला, ‘ईश्वराचा दृष्टान्त अमान्य करणं हेंहीं अयोग्य आहे.” मग उभयतांनीं विचार केला. तिला नगरांतून हांकून लावलं.

पुढं ती दीन झाली. रस्त्यानं जाऊं लागली. जातां जातां एका नगरांत गेली. तिथं एका म्हातारीच्या घरीं उतरली. तिनं तिला ठेवून घेतलं, खाऊंपिऊं घातलं. पुढं काय झालं? एके दिवशीं म्हातारींनं तिला चिवटं विकायला पाठवलं. दैवाची गति विचित्र आहे! बाजारांत ती चालली. मोठा वारा आला, सर्व चिवटं उडून गेलीं. तिनं घरीं येऊन म्हातारीला सांगितलं. तिनं तिला घरांतून हांकलून लावलं. तिथून निघाली तों एका तेल्याच्या घरीं गेली, तिथे तेलाच्या घागरी भरल्या होत्या, त्यांजवर तिची नजर गेली. तसं त्यातलं सगळं तेल नाहीसं झालं. म्हणून तेल्यानं तिला घालवून दिलं. पुढं तिथून निघाली. वाटेनं जाऊं लागली. जातां जातां एक नदी लागली. त्या दिवशी नदीला पाणी पुष्कळ होतं. पण तिची द्रुष्टि त्याजवर गेल्याबरोबर सर्व पाणी आटून गेलं. पुढं जातां जातां एक सुंदर तळं लागलं. त्याजवर तिची दृष्टी गेली, तसे पाण्यांत किडे पडले. पाणी नासून गेलं. रोजच्यासारखे तळ्यावर गुराखी आले. नासकं पाणी पाहून मागं परतले. गुरंढोरं तान्हेलीं राहिली. पुढं काय झालं? तिथं एक गोसावी आला. त्यानं तिला पाहिलं. कोण कुठची म्हणून सगळी हकीकत विचारली. तिनं सगळी हकीकत सांगितली. गोसाव्यानं तिला धर्मकन्या मानलं व आपले घरीं घेऊन आला. तिथं राहून ती कामधंदा करूं लागली. तशी जिकडे तिकडे तिची दृष्टी जाऊं लागली. ज्यांत तिची दृष्टी जाई त्यांत किडे पडावे, कांहीं जिनसा आपोआप नाहींशा व्हाव्या, असा चमत्कार होऊं लागला. मग गोसाव्यानं विचार केला. अंतर्द्दष्टि लावली. तिच्या पदरीं व्रत मोडल्याचं पाप आहे असं त्यानं जाणलं. तें नाहीसं केल्याशिवाय तिची दृष्टी चांगलीं होणार नाहीं असं ठरवलं. मग त्यानं शंकराची प्रार्थना केली. देव प्रसन्न झाले. गोसाव्यानं राणीबद्दल प्रार्थना केली. शंकरानं तिला सोळा सोमवाराचं व्रत करायला सांगितलं व आपण अंतर्धान पावले. पुढं गोसाव्यानं तिच्याकडून सोळा सोमवाराचं व्रत करविलं, तसा परमेश्वराचा कोप नाहींसा झाला.

तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा उद्भवली, दूत चोहीकडे शोधाला पाठवले. शोधतां शोधतां तिथं आले. गोसाव्याच्या मठींत राणीला पाहिलं. तसंच जाऊन त्यांनी सांगितलं. त्याला मोठा आनंद झाला. राजा प्रधानासुद्धा गोसाव्याकडे आला. गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला. वस्त्रप्रावर्णं देऊन संतोषित केलं. गोसावी म्हणाला, “राजा राजा, ही माझी धर्मकन्या. मी इतके दिवस तिला माहेरी ठेवूनीं घेतलं होतं, ती तुझी स्त्री आपले घरीं घेऊन जा व चांगल्या रीतीनं पाणिग्रहण करून सुखानं नांद.”राजानं होय म्हटलं. गोसाव्याला जोड्यानं नमस्कार केला व राणीला घेवून आपल्या नगरीं आला. पुढं मोठा उत्सव केला. दानदक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले. राजाराणींची भेट झाली. आनंदानं रामराज्य करूं लागली.

तसे तुम्ही शंकराला प्रसन्न करून रामराज्य करा. ही साठां उत्तरांची कहाणी पांचा उत्तरीं, देवाब्राह्मणांचे द्वारीं, गाईचे गोठींत, पिंपळाचे पारीं सुफळ संपूर्ण.

श्री हरितालिकेची कहाणी

एके दिवशीं ईश्वरपार्वती कैलास पर्वतावर बसलीं होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, “महाराज, सर्व व्रतांत चांगलं ब्रत कोणतं? श्रम थोडे, आणि फळ पुष्कळ, असं एकादं व्रत असलं, तर मला सांगा. आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरीं पडालें हेंही मला सांगा.” तेव्हां शंकर म्हणाले, “जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहांत सूर्य श्रेष्ठ, चार वर्णांत ब्राह्मण श्रेष्ठ, देवांत विष्णु श्रेष्ठ, ग्रहांत सूर्य श्रेष्ठ, चार वर्णांत ब्राह्मण श्रेष्ठ देवांत विष्णु श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणं हरितालिका हें व्रत सर्वांत श्रेष्ठ आहे तें तुला सांगतों. तेंच तूं पूर्वजन्मीं हिमालय पर्वतावर केलंस, आणि त्याच पुण्यानं तूं मला प्राप्त झालीस तें ऐक. हें व्रत भाद्रप्रद महिन्यांतला पहिल्या तृतीयेला कराव. तें पूर्वी तूं केलंस तें मी तुला आतां सांगतों. तूं लहानपणीं मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. चौसष्ट वर्षे तर झाडाचीं पिललेली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन हीं तिन्ही दुःख सहन केलींस. हे तुझे श्रम पाहून तूझ्या बापाला फार दुःख सहन केलींस. हे तुझे श्रम पाहुन तुझ्या बापाला फार दुःख झालं, आणि अशी कन्या कोणास द्यावी? अशी त्याला चिंता पडाली. इतक्यांत तिथं नारदमुनि आले. हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं. तेव्हां नारद म्हणाले, “तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी. तो तिच्यायोग्य नवरा आहे. त्यांनींच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे. म्हणून इथं मी आलों आहे.” हिमालयाला मोठाआनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून निघून विष्णूकडे आले. त्यांना ही हकीकत कळविली व आपण निघून दुसरीकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापानं ती गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाहीं. तूं रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हां तूं सांगितलंस, महादेवावांचून मला दुसरा पति करणं नाही; असा माझा निश्चय आहे. असे असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबुल केलं आह. ह्याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यांत नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेंत जाऊन तूं उपास केलास. तिथं माझी लिंग पार्वतीसह स्थापिलंस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्रीं जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं, नंतर मि तिथं आलों. तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तूं म्हणालीस,“तुम्ही माझे पति व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाहीं,” नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालों. पुढं दुसऱ्या दिवशीं ती व्रतपूजा तूं विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यांत तुझा बाप तिथे आला. त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तूं सर्व झालेली हकीखत त्याला सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग कांही दिवसांनीं चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलं. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरितालिका व्रत असं म्हणतात. याचा विधि असा आहे.

“ज्या ठिकाणीं हें व्रत करायचं असेल त्या ठिकणी तोरण बांधावं. केळीचे खांब लावून तें स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारे त्याची पूजा करावी. मनोभावें त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्रीं जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. साती जन्माचं पातक नाहींस होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. ह्या दिवशीं बायकांनीं जर कांहीं खाल्लं, तर त्या जन्मवंध्या व विधवा होतात. दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो. कहाणी केल्यावर सुवासिनींना यथाशक्ति वाण द्यावं. दुसरे दिवसीं उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं.”

ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरीं, देवाब्राह्मणाचे द्वारीं, गाईचे गोठीं, पिपळाच्या पारीं, सुफळ संपूर्ण.

श्रीविष्णूची कहाणी

ऐका परमेश्वरा महाविष्णु, तुमची कहाणी. काशीपूर नगर, सुवर्णाचा वड, भद्रकाळी गंगा, नव नाडी, बावन आड. तिथं एक सप्तक्या ब्राह्मण तप करीत आहे. काय करतो? सकाळीम उठतो, स्नानसंध्या करतो, विभूतीचं लेपन करतो, तोबोटी लंगोटी घालतो. खांदी कुऱ्हाड घेतो, वनास जातो, वनचीं फळं आणतो. त्यांचा उत्तम पाक करतो. त्याचे पांच भाग करतो. देवाचा देवाला देतो, अतिथीचा अतिथीला देतो, ब्राह्मणाचा ब्राह्मणाला देतो, गाईचा गाईला देतो, उरलंसुरलं आपण खातो. असं करतां करतां नखं रुपलीं, बोटं खुपलीं, आंगीं रोम वाढिन्नले, मस्तकीं जटा वाढिन्नल्यां. अठ्यायशीं सहस्त्र वर्षं तपास भरलीं. एवढं तप कुणा कारणें करतो? महाविष्णु भेटावा याकारणें करतो. कपोत कपोती एका वृक्षावर बसलीं होती, तीं त्याला विचारूं लागलीं “भाल्या ब्राह्मणा, जपी ब्राह्मणा, तपी ब्राह्मणा , माळी ब्राह्मणा, चरणीं तर चालतोस, मुखीं तर वदतोस. एवढं त्प कोणाकारणें करतोस?” “महाविष्णु भेटावा याकारणें करतों.” शेषशयनीं सुवर्णमंचकीं, महाविष्णु निजले होते. तिथं येऊन कपोत कपोती सांगूं लागलीं. “काशीपूर नगर, सुवर्णाचा वड, भद्रकाळी गंगा , नव नाडी, बावन आड. तिथंएक सप्तक्या ब्राह्मन तप करीत आहे. काय करतो? सकाळी उठतो, स्नानसंध्या करतो, विभूतीचं लेपन करतो? तिबोटी लंगोटी घालतो, खांदीं कुऱ्हाड घेतो. वनास जातो. वनचीं फळें आणतो, त्याचा उत्तम पाक करतो. त्याचे पांच भाग करतो. देवाचा देवाला देतो, अतिथीचा अतिथीला देतो, ब्राह्मणाचा ब्राह्मणाला देतो, गाईचा गाईला देतो, उरलंसुरलं आपण खातो, असं करतां करतां नखं रुपलीं, बोटं खुपलीं, आंगीं रोम वाढिन्नले, मस्तकीं जटा वाढिन्नल्या, अठ्यायशीं सहस्त्र वर्षे तपास भरलीं. एवढं तप कोणाकारणें करतो? महाविष्णु भेटावा याकारणें करतों.” महाविष्णु बरं म्हणाले. झटकन उठले. पायीं पावा घातल्या. मस्तकीं पीतांबर गुंडाळला. ब्राह्मणाजवळ उभे राहिले. “भल्या ब्राह्मणा, जपी ब्राह्मणा, तपी ब्राह्मणा, माळी ब्राह्मणा, चरणीं तर चालतोस, मुखीं तर वदतोस, एवढं तप कोणाकारणें करतोस?” ‘ महाविष्णु भेटावा याकारणें करतों.” तेव्हां “महाविष्णु तो मीच”असं म्हणाले. “कशानं भेटावा? कशानं ओळखावा?” “असाच भेटेन, असाच ओळखेन.” शंख-चक्र-गदा-पद्म-पीतांबरधारी अयोध्याचारी माघारीं वळला, तों महाविष्णूची मूर्त झाली. “भल्यारे भक्ता, शरणागता, राज्य माग, भांडार माग, संसारीचं सुख माग.”
“राज्य नको, भांडार नको, संसारीचं सुख नको, तुझं माझं एक आसन, तुझी माझी एक शेज, तुझी माझी एक स्तुति.” कुठं करावी?” देवाद्वारीं, भल्या ब्राह्मणांच्या आश्रमीं.” असं त्याला एकरूप केलं. महाविष्णूची कहाणी ऐकती, त्यांची किल्मिष पातकं हरती. नित्य कहाणी करती, त्यांना होय विष्णुलोकप्राप्ती. ही साठां उत्तरांची कहाणी, पांचा उत्तरीं सुफळ संपूर्ण.

(तात्पर्य : जो सद्धर्मानें वागतो व सत्कर्म करण्यांत आपलें आयुष्य घालवितो त्याला अखेर देव भेटल्याशिवाय राहात नाहीं.)









No comments:

Post a Comment

Followers

Info@nashik

Nashik, Maharastra, India
ठरवलं ना एकदा… मागे वळुन पुन्हा, आता नाही बघायचं… विसरलेल्या आठवणींना, आता नाही आठवायचं… चुकार हळव्या क्षणात, आता नाही फसायचं… अपेक्षांचे ओझे आता, मनावर नाही बाळगायच… नागमोडी वळणावर आता, नाही जास्त रेंगाळायचं… निसरड्या वाटेवर आता, नाही आपण घसरायचं… स्वतःच्या हाताने आता, स्वतःला सावरायचं… नी स्वतःचे आयुष्य, स्वतःच आपण घडवायचं…